मालदन येथील ब्रिटिशकालीन गेटची जपणूक करण्याची नागरिकांची मागणी


तळमावले : मालदन (ता. पाटण) येथील ब्रिटिशकालीन गेट शेवटची घटका मोजत आहे. मालदन गावास तसा प्राचीन इतिहास आहे. या गावामध्ये विभागातील पहिले पोलिस ठाणे बांधण्यात आले. हे पोलिस ठाणे ब्रिटिशकालीन असल्यामुळे यास प्राचीन इतिहास आहे. 
या इमारतीची दुरवस्था झाली आहे. सिमेंटचा पत्रा तसेच बांधकामासाठी वापरलेल्या सागवानी लाकडाची चोरी झाली आहे. ही इमारत प्राचीन असल्यामुळे तिची जपणूक करण्याची मागणी मालदन गावातील नागरिकांनी केली आहे. विभागातील ब्रिटिशकालीन पहिले हे पोलिस गेट असल्यामुळे याला विशेष स्थान निर्माण झाले आहे. कालांतराने हे पोलिस ठाणे ढेबेवाडी या ठिकाणी हलविण्यात आले. मालदनमधील ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी या इमारतीमध्ये ब्रिटिशांची वसाहत होती. 
तसेच ब्रिटिश अधिकारी आणि इतर पोलिस कर्मचारी या ठिकाणी राहत होते. येथूनच कायदा सुव्यवस्था राखण्यात येत होती. तसेच क्रांतिकार्‍यांना या ठिकाणी ठेवण्यात येत होते. देशासाठी बलिदान देणार्‍यांचा सहवास या इमारतीस लाभला आहे. त्यामुळे या इमारतीची जपणूक होणे गरजेचे आहे. तसेच ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी येत होते. त्यावेळेस त्यांची सोय मालदन फाट्यावर एक आंब्याचे झाड होते त्या झाडाखाली मोठा तंबू उभारुन करण्यात येत होती. कारण वांगनदीवर पूर्वी पूल नव्हता. बरीच गैरसोय असल्यामुळे गावाच्या बाहेर त्या ब्रिटिश अधिकार्‍यांची सोय करण्यात येत होती. या ब्रिटिशकालीन गेटची शासनाने पुढाकार घेऊन दुरुस्ती करावी. तसेच जपणूक करावी, या मागणीचा जोर वाढला आहे.

No comments

Powered by Blogger.