मधमाशापालनास राज्यात मोठा वाव


सातारा :  महाराष्ट्रातील सद्य:स्थिती पाहता, मधमाशापालनास राज्यात मोठा वाव आहे. विदर्भातील मोठ्या प्रमाणात असलेले जंगल, मराठवाड्यातील तेलबियांचे वाढलेले क्षेत्र तर पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि मेळघाटातील सातपुडा पर्वत, राज्यातील उर्वरित भागात वाढलेल्या फळबागा मधमाशा पालनास पूरक आहेत त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना मधमाशा पालन व्यवसाय एक प्रमुख उद्योग व्हावा याद‍ृष्टीने खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मधमाशा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.मधमाशापालनातून अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व आर्थिकद‍ृष्ट्या कमकुवत असणार्‍या लोकांची मधमाशापालनातून स्वयंम रोजगारातून आर्थिक उन्नती होऊ शकते.

पश्‍चिम घाट क्षेत्र जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ठ झाल्याने या ठिकाणी असणारी वनसंपदा निसर्गाचे व पर्यावरणाचे संवर्धन जतन करणे आवश्यक आहे. त्याद‍ृष्टीने मधमाशा पालन उद्योग हा सर्व उद्दिष्टांशी सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत. मधमाशी केवळ मध आणि मेण देत नाही तर तिने केलेल्या परागीकरणामुळे पीक उत्पादन वाढते. शिवाय उत्पादनाची प्रतही सुधारते.विषारी कीटकनाशके, अमर्याद जंगलतोड, फळाफुलांची कमी आणि प्रदुषणामुळे मधमाशांची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याने त्याची झळ पीक उत्पादनाला बसत आहे.

आजही राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. अनेक कारणांमुळे शेती उत्पन्न म्हणावे तसे मिळत नसल्याने पूरक उद्योग गरजेचे ठरू लागले आहेत. शेतीबरोबरच डोंगरदर्‍यातील जनतेने उत्पन्नाचे अन्य पर्याय म्हणून मधमाशा पालनासारखे व्यवसाय करणे आवश्यक आहे.पश्‍चिम घाटातील डोंगर दर्‍या व अतिदुर्गम भागात राहणार्‍या लोकांना मधमाशापालन हा उद्योग आर्थिक स्थैर्य देत आहे. मधमाशापालन केल्याने मधपाळ आर्थिकद‍ृष्ट्या स्वावलंबी होवून सामाजिक सहजीवनाची जाणीवही मध उद्योगामुळे त्यांच्या मनात निर्माण होते.

सातेरी मधमाशापालनात अहमदनगर, पुणे, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील सह्याद्रीच्या रागांमधील 63 तालुक्यांचा समावेश आहे. वर्षभर सदाहरीत असणार्‍या जंगलभागात मोठ्या प्रमाणात सातेरी मधमाशापालन करण्यास वाव आहे. सध्या हजारो मधपाळ शासत्रोेक्‍त पद्धतीने मधमाशापालन करत आहेत. जंगलातील विविध वनस्पतीपासून मिळणारा मध औषधीमूल्य असणारा आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ‘मेलीफेरा’ मधमाशापालनास मोठा वाव आहे. पिकांच्या परागीभवनासाटी ‘मेलीफेरा’ मधमाशांचा फार उपयोग होतो.

मधमाशा फुलातून मकरंद गोळा करून व शरीरातील पाचक रस त्यात मिसळून व मकरंदातील पाण्याचे प्रमाण कमी करून शुद्ध मध पोळ्यात साठवतात. मध हा शरीराला अत्यंत उपयुक्‍त घटक आहे. मध शक्‍तीदायक व पौष्टिक अन्न व औषध आहे.तसेच गुणधर्म म्हणूनही मधाकडे पाहिले जाते. मधमाशापासून मेण मिळते. मेणाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधे , चर्चमधील मेणबत्या तयार करण्यासाठी होतो.सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांत जंगल व अतिदुर्गम भागातील 57 गावांत सेंद्रीय मध प्रमाणीकरण करून ‘मधुबन’ या नावाने ब्रँड विकसित करण्यात आला आहे.

राज्यातील 27 जिल्ह्यांतील 244 तालुक्यांतील 1 हजार 123 गावांमध्ये 5 हजार 134 मधपाळ असून त्यांच्याकडे ‘सातेरी’ मधमाशांच्या 15 हजार 923 तर ‘मेलीफेरा’ मधमाशांच्या 12 हजार 506 अशा मिळून 28 हजार 129 मधपेट्या आहेत. ‘सातेरी’ च्या चालू वसाहतीची संख्या 6 हजार 979 तर ‘मेलीफेरा’ वसाहतीची संख्या 4 हजार 732 असे मिळून 11 हजार 711 मधमाशांच्या वसाहती आहेत.

मधमाशाद्वारे परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होत असून राज्यातील सर्व घटकांतील लाभार्थ्यांना मधमाशा पालन व्यवसायातून उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले आहे. राज्यात मध उद्योगासाठी वातावरण पोषक आहे.. - विशाल चोरडिया, सभापती,महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ

‘मधुबन’च्या माध्यमातून मधाला चांगला दर दिला जात असल्याने जास्तीत जास्त तरूणांनी मधमाशापालनाकडे वळणे आवश्यक असून जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता मधमाशा पालनास वाव आहे. - बिपीन जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

No comments

Powered by Blogger.