ढेबेवाडी विभागातील वनरक्षक महिलेचा विनयभंग


पाटण : राज्यात व देशात सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर असतानाच पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात एका वनरक्षक महिलेचा त्याच ठिकाणच्या वनपालाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला कर्मचार्‍याने वरिष्ठांसह महिला तक्रार निवारण समिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अध्यक्षांकडे तक्रार करून पंधरा दिवसांनंतरही या महिलेला न्याय मिळाला नाही. ढेबेवाडी विभागात ही तिसरी घटना घडली आहे.

स्वाभाविकच या विभागात महिला असुरक्षित असून त्यांना न्याय देण्याऐवजी प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, 30 एप्रिल बुद्धपौर्णिमेदिवशी वन्यजीव विभागामार्फत प्राणी गणना करण्यात आली. या गणनेसाठी संबंधित महिला वनरक्षक आपल्या वरिष्ठ प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल यांचेसोबत जीपमधून प्राणी गणनेसाठी जंगलात गेल्या होत्या. त्याच जीपमध्ये असणार्‍या एका वनपालाने त्या महिला वनरक्षीकेचा विनयभंग केला. संबंधित महिलेने तात्काळ याबाबत संबंधितावर कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्जही वरिष्ठांकडे दिला. याशिवाय हीच तक्रार अध्यक्ष महिला तक्रार निवारण समिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचेकडेही एक मे रोजी केली होती. त्यावर संबंधित प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल व स्वयंसेवक यांच्याही स्वाक्षर्‍या आहेत. त्यानंतर संबंधित महिला वनरक्षक रजेवर गेल्या आहेत. संबंधित वनपालावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने विभागात संताप व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही या विभागात अशा घटना घडल्या आहेत. काहींनी तक्रारी केल्या तर काहींचा आवाज कारवाया करू म्हणून दाबूनही टाकण्यात आला आहे. मध्यंतरी याच खात्यातील एका महिला कर्मचार्‍याने बेकायदेशीर वृक्षतोड व त्याला वरिष्ठांचे पाठबळ हे प्रकरण पुराव्यानिशी उजेडात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यावर कारवाई होण्याऐवजी त्या महिला कर्मचार्‍याचीच बदली करण्यात आली. त्यामुळे या विभागात काम करणार्‍या महिला सुरक्षित नाहीत हेच समोर आले. हे प्रकरण दबावाने दडपले जाणार की संबंधित दोषी वनपालवर कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

तिसरा प्रकार..

चार वर्षांपूर्वी भोसगाव ( ढेबेवाडी ) येथील विश्रामगृहात जिल्हा वन अधिकार्‍याने महिला कर्मचार्‍यांना एकत्रीत बोलावून ’ माझ्याशी फ्रेंडशिप करा ’ असे वक्तव्य केले. त्याचे गंभीर पडसाद उमटले. त्याची या प्रकरणी बदली करण्यात आली. मधल्या काळात याच विभागात सहाय्यक वनसंरक्षकांने जीपमध्ये महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केला तो त्या प्रकरणात निलंबित झाला. आता वरिष्ठांदेखतच महिला कर्मचार्‍याचा विनयभंग करण्याचे धाडस वनपालाने केले.

No comments

Powered by Blogger.