मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजधानी महोत्सव


सातारा : मे महिन्यात सातार्‍यात होणार्‍या राजधानी महोत्सवाला मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिलेले निमंत्रण स्विकारले आहे. त्यामुळे हा राजधानी महोत्सव दिमाखात आणि मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महोत्सवात महानायक अमिताभ बच्चन यांना छत्रपती घराण्याचा शिवसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.खा. उदयनराजे भोसले यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सातार्‍यात होणार्‍या राजधानी महोत्सवाचे निमंत्रण खा. उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी ना. फडणवीस यांनी यानिमित्ताने पुन्हा सातार्‍यात यायला आवडेल, असे उद्गार काढले. तसेच महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुकही केले.

25 ते 27 मे दरम्यान राजधानी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 27 मे रोजी सायंकाळी छत्रपती घरण्याकडून देण्यात येणार्‍या शिव- सन्मान पुरस्कारासाठी मुख्यमंत्री आणि महानायक अमिताभ बच्चन सोबतच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवथरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी खा. उदयनराजे यांच्यासोबत सुनील काटकर, अशोक सावंत, काका धुमाळ, संग्राम बर्गे, पंकज चव्हाण उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.