शेड पाडल्याने मुख्याधिकार्‍यांच्या केबिनसमोर कुटुंबीयांचा ठिय्या


कराड : येथील बुधवार पेठेतील दादा केरू खरात यांनी घरासमोरील जागेत दुरुस्ती केलेले शेडचे बांधकाम पाडल्याने खरात कुटुंबीयांनी कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कार्यालयात शनिवारी सायंकाळी ठिय्या मारला. रात्री उशिरापर्यंत खरात कुटुंबीय कार्यालयातच ठिय्या मारून बसल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.खरात कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरासमोरील शेडची दुरुस्ती केली होती. मात्र त्यानंतर काही लोकांनी अतिक्रमण केल्याची तक्रार नगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने खरात कुटुंबीयांना नोटीस देत अतिक्रमण काढण्याची सूचना केली होती. मात्र हे अतिक्रमण नसल्याचा दावा करत खरात कुटुंबीयांनी याठिकाणी 50 वर्षांपासून वहिवाट असल्याचा दावा केला होता.

अतिक्रमण केल्याची तक्रार खोटी असल्याचेही खरात कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी पालिकेच्या नोटिसीला उत्तरही दिले होते. मात्र हे उत्तर पालिकेपर्यंत पोहोचलेच नसल्याचे खरात कुटुंबीयांना मुख्याधिकार्‍यांनी सांगितले आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आम्ही कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिका खरात कुटुंबीयांनी घेतली. तर मुख्याधिकारी सोमवारी चर्चा करू, असे सांगत होते. मात्र खरात कुटुंबीय ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने मुख्याधिकार्‍यांनी पालिकेतून बाहेर पडणेच पसंत केले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेपर्यंत खरात कुटुंबीय मुख्याधिकार्‍यांच्या केबिनमध्येच ठिय्या मारून बसले होते. पोलिस कर्मचारी खरात कुटुंबीयांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते.

No comments

Powered by Blogger.