Your Own Digital Platform

येरळवाडीत विवाहितेची मुलासह आत्महत्या


वडूज : येरळवाडी, ता. खटाव येथील रूपाली सुनील थोरात (वय 25) या विवाहित महिलेने सासरच्या जाचहाट, मारहाणीस कंटाळून पाच वर्षांच्या मुलासहित विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, येरळवाडी, ता. खटाव येथील सुनील श्रीरंग थोरात याच्याबरोबर रूपाली हिचा विवाह 2012 साली झालेला होता. रूपाली हिला सासरच्या लोकांकडून जाचहाट व मारहाण होत होती. आजेसासू गोदाबाई थोरात, सासू तानुबाई श्रीरंग थोरात, जाऊ संगीता संतोष थोरात, दीर संतोष श्रीरंग थोरात व पती सुनील श्रीरंग थोरात यांनी माहेरून चटणी करण्याचा डंग घेण्यासाठी एक लाख रुपये व टेम्पो ट्रक घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा वारंवार छळ करत होते. त्यास कंटाळून मुलगा श्रीधर (वय 5) याच्यासह तिने थोरात यांच्या चावर नावाच्या शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मृत रूपालीचे वडील चंद्रकांत सोपान देवकर (रा. बनपुरी) यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

यावरून पतीसह पाच जणांविरोधात 498 (अ) , 306, 34 अन्वयेे वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, सासू तानुबाई श्रीरंग थोरात व जाऊ संगीता संतोष थोरात यांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पो. नि. यशवंत शिर्के करीत आहेत. सायंकाळी रात्री उशिरा वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.