‘तुम्ही तुमच्या जागेवर जा, आम्हाला आमची जागा द्या’


कराड: माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनोमिलनाच्या गप्पांचा आनंद जिल्हावासीय (विशेषत: कराडकर) लुटत आहेत. जे कधी होणारच नाही त्या मिलनाच्या, त्यानंतरच्या गळाभेटीच्या आणि मधुमिलनाच्या गप्पा पारावर सुरु आहेत. मात्र या दोन टोकाच्या नेत्यांमधील एकमेकांप्रती असलेला दु:श्‍वास,अहंकार तसेच माझी जागा मला द्या, तुम्ही तुमच्या जागेवर जा! ही उंडाळकर गटाची असलेली आग्रही मागणी या प्रमुख तीन कारणांमुळे काका-बाबा गटाच्या एकत्रिकरणावर प्रश्‍नचिन्ह आहे. 
सलग सात टर्म कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सातारा जिल्ह्यावर अनेक वर्षे प्रभुत्व होते. 2010 साली अनपेक्षितरित्या काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दिल्लीहून निवड झाली. यानंतर उंडाळकर गटाला हळूहळू ग्रहण लागले. काँग्रेसचे आमदार असूनही 2010 ते 2014 या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी उंडाळकरांना फारसे जवळ केले नाही. 2014 विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदावरील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय काँगे्रस पक्षाने घेतला. सक्षम असूनही उंडाळकर यांना डावलण्यात आले आणि पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने दक्षिणचे तिकिट दिले. उंडाळकरांनी कार्यकर्त्यांच्या रेट्याच्या जोरावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. भाजपचे अतुल भोसलेही रिंगणात होते. मुख्यमंत्री पदाचे वलय, मतदारसंघात दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी आणि सत्‍ता आली तर कराडला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल, या आशेवर कराडकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून दिले. हा इतिहास ताजा आहे. 

No comments

Powered by Blogger.