दातेगडावर गडावर ऐतिहासिक व धार्मिक अशी आश्‍चर्यजनक ठिकाणे


पाटण : पाटण शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेला दातेगड तथा सुंदरगड. प्राचीन असणार्‍या याच गडावर ऐतिहासिक, धार्मिक व आश्‍चर्यजनक अशी अनेक ठिकाणे आहेत. या गडावरील सर्वात मोठे आश्‍चर्य म्हणजे येथील तलवारीच्या आकाराची विहीर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदरच्या काळापासून तिचे अस्तित्व असल्याचे सांगण्यात येते. तलवारीच्या आकाराच्या या विहिरीची खोली सुमारे 102 फूट तर रुंदी सुमारे 220 फूट इतकी आहे. तलावारीला असणार्‍या वज्रमुठीचाही टोकाला आकार देण्यात आला आहे. याशिवाय या विहिरीतच गुहा असून त्यात शंकराची पिंडही आहे. खालच्या बाजूला एक टनेल तथा गुहेसारखा भाग असून त्यामध्ये गेल्यानंतर ए. सी. ( वातानुकूलित यंत्र ) पेक्षा मनमोहक गारवा येथे मिळतो. या पाण्यात छोटा दगड टाकल्यानंतर त्यातून भांड्यासारखा आवाजही येतो.

याच गडावर स्वयंभू गणपती व मारुतीची मूर्ती व छोटेखानी मंदिरे आहेत. यातील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सूर्य उगवताना त्याचा पहिला किरण गणपतीच्या चेहर्‍यावर तर सूर्य मावळताना शेवटचा किरण मारुतीच्या चेहर्‍यावर पडतो. अशा प्रकारचे महत्त्व, महात्म्य व आश्‍चर्यजनक अनेक वैशिष्ट्ये असणार्‍या या सुंदरगडला आता आपण नक्‍कीच भेट द्याल यात शंकाच नाही.

No comments

Powered by Blogger.