साबळवाडी पाझर तलाव दुरुस्त होणार कधी?


उंब्रज : साबळवाडी (ता.कराड) येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या पाझर तलावाला काही वर्षापूर्वी लागलेली गळती प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ‘जैसे थे’ स्थितीत असून, पाणी आडवा पाणी जिरवा असे आवाहन करणार्‍या प्रशासनाला साबळवाडी येथील पाझर तलाव दुरूस्त करण्याची जाग येणार तरी कधी ? असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून पाझर तलाव दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.1972 मध्ये साबळवाडी गावचे पश्‍चिम बाजूस डोंगराच्या पायथ्यास डोंगरदर्‍यामधून येणारे पाणी आडविण्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत करून याठिकाणी पाझर तलावाचे काम पूर्ण करण्यात आले होते. सन 2004 मध्ये या तलावाची दुरुस्ती करण्यात आली होती. यामध्ये तलावातील गाळ काढण्याबरोबरच तलावाच्या कडेला दगडी कामाचे पिचिंग करून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. या कामानंतर पावसाळ्यात या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन पाणी सांडव्यावरून वाहत होते. मात्र तलावाच्या दुरुस्तीचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने पावसाळा संपल्यानंतर अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत तलावात पाण्याचा एक थेंबही राहिला नाही. तलावाच्या संरक्षक भिंतीतून पाण्याची सतत गळती सुरू झाली ती आजअखेर ही गळती सुरूच आहे. परिणामी पावसाळ्यात तलाव काठोकाठ भरूनही अवघ्या दोन महिन्यात तलाव कोरडा पडत आहे.

या पाझर तलावाच्या दुरूस्तीबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा शासनदरबारी दुरूस्तीची मागणी करून या तलावाची दुरूस्ती झाल्यास तलावात मोठया प्रमाणात पाणीसाठा होऊन साबळवाडी गावास याचा फायदा होईल असे सांगून तलावाच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची विनंती करीत आहेत मात्र संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे अद्याप लक्ष दिले नाही. शासन एकीकडे पाणी आडवा पाणी जिरवा असा संदेश देवून जलसंधारणाची कामे युध्दपातळीवर करीत आहे तर दुसरीकडे पंचेचाळीस वर्षापूर्वीचा मोठा पाझर तलाव दुरूस्तीविना संबंधित विभागाकडून दुर्लक्षित होत असेल तर दुर्दैव म्हणावे लागेल.

आज रोजी सदरचा तलाव हा पूर्णपणे कोरडा आहे. सध्याच्या स्थितीला तलावातील गाळ काढण्याबरोबरच तलावाच्या संरक्षक भिंतीबरोबरच अन्य एक ते दोन ठिकाणी तलावाला लागलेली गळती काढणे शक्य होणार आहे व असे केल्यास या तलावात मोठया प्रमाणात पाणी साठपा होण्यास मदत होणार आहे. साबळवाडी या गावाच्या डोंगरपायथ्याला विस्तीर्ण जागेत हा पाझर तलाव आहे. पावसाळयात डोंगरदर्‍यातून मोठया प्रमाणात पाणी या तलावात येते. पावसाळ्यात हा तलाव पावसाच्या पाण्याने काठोकाठ भरला जातो. मात्र तलावाच्या संरक्षक भिंतीला व अन्य एक ते दोन ठिकाणी गळती असल्याने हा काठोकाठ भरलेला तलाव अवघ्या एक ते दोन महिन्यात पूर्णतः कोरडा होतो.

पाझर तलावाची मोठया प्रमाणात सुरू असलेली गळती थांबण्यासाठी तलावाचे भक्‍कम पध्दतीने काँक्रीटीकरणाद्वारा पिचिंग होणे आवश्यक आहे. तसेच संरक्षक भिंतीचे केटीवेअर बंधार्‍यासारखे काँक्रीटीकरण व इतर किरकोळ दुरूस्ती केल्यास तलाव पूर्ण भरण्याबरोबरच या पाण्याचा साबळवाडी येथील शेतकरी यांना नक्‍कीच फायदा होणार आहे.

No comments

Powered by Blogger.