स्वच्छतेत पाचगणी नगरपालिकेचा डंका अखेर देशपातळीवर


पाचगणी :  पाचगणी नगरपालिकेचा डंका अखेर देशपातळीवर पोहोचला असून स्वच्छता अभियानात या पालिकेने देशपातळीवरील पश्‍चिम झोनमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचाही बहुमान झाला असून पाचगणीत फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पाचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर व त्यांच्या संपूर्ण टीमने नागरिकांना सोबत घेऊन स्वच्छता अभियानात जोरदार काम केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छतेच्या चळवळीने शहराला क्रांतीचे स्वरूप आले होते. अबालवृद्धांसह प्रत्येक नागरिक या चळवळीत झपाटून कामाला लागला होता. आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी कृतियुक्त सहभाग नोंदवला होता. पाचगणी पालिकेच्या या उठावदार कामगिरीची दखल अखेर देशपातळीवर पोहोचली. देशपातळीवरील पश्‍चिम झोनमध्ये या नगरपालिकेने नंबर एक कामगिरी केली. देशांतील पश्‍चिम विभागात गोवा, दीव दमन, गुजरातसारखी राज्ये असताना देखील पाचगणीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे शहरात बुधवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पाचगणी नगरपालिकेने अभियानात काटेकोरपणे स्वच्छतेचा जागर करत प्लास्टीक निर्मुलन, अद्यावत घनकचरा प्रकल्प, पाचगणीतील सर्व शाळांमध्ये स्वच्छतेचा जागर, ओलासुका कचरा वर्गीकरण आदी बाबींवर पालिकेने ठोस कार्य केले असून त्याची पोहोचपावती मिळाली आहे.

पाचगणी पालिकेचा स्वच्छता अभियानात देशपातळीवरील पश्‍चिम झोनमध्ये आलेला पहिला क्रमांक हे प्रत्येक पाचगणीकराने या चळवळीत नोंदवलेल्या सहभागाचे फलित आहे. नगरपालिकेने स्वच्छता अभियानात कुठेही कमतरता ठेवली नव्हती. नागरिकांनीही उत्साहाने साथ दिली. त्यामुळे हे यश सुखावणारे आहे. - लक्ष्मी कर्‍हाडकर, नगराध्यक्षा, पाचगणी

No comments

Powered by Blogger.