ऊस बिलाप्रश्‍नी ना. रामराजेंची खा. शरद पवार यांच्याशी चर्चा


फलटण :  न्यू फलटण शुगर’च्या प्रश्‍नात आता विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. या कारखान्याने शेतकर्‍यांची ऊस बिले थकवली आहेत. तसेच कामगारांची देणी थकीत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी ना. रामराजे यांनी खा. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

‘न्यू फलटण शुगर’चे शेतकरी व कामगारांची देणी थकवल्याने या कारखान्याविरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते. कारखान्याने वेळोवेळी आश्‍वासने दिली. मात्र, त्यांना काही कारणास्तव ती पूर्ण करता आली नाही. त्यामुळे कारखाना अडचणीत आला आहे. याबाबत ना. रामराजे व प्रल्हादराव साळुंखे यांनी शुक्रवारी खा. शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली असून त्याबाबत सोमवारी मुंबईत पुन्हा बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनीही आपल्या सहकार्‍यांसमवेत खा. शरद पवार यांची भेट घेऊन ‘न्यू फलटण शुगर’ प्रश्‍नी लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. कारखाना प्रश्‍नी योग्य मार्ग निघण्याची आवश्यकता आहे. या कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकर्‍यांप्रमाणे सुमारे 500 कामगारांचे भवितव्य अवलंबून असल्याने हा प्रश्‍न लवकर सुटला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी तात्यासाहेब काळे यांनी व्यक्त केली.

No comments

Powered by Blogger.