कवठेजवळ अपघातात एक ठार


ओझर्डे : सातारा-पुणे महामार्गावरील कवठे गावच्या हद्दीत वॅगन आर कार व दुचाकीच्या भीषण धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील अन्य एक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. सचिन वामनराव शिंदे (वय 38, रा. अनवडी, ता. वाई) यांचा अपघातात मृत्यू झाला असून, सचिन संपत बाबर (वय 40, रा. जांब ता वाई) हे गंभीर जखमी आहेत. सचिन शिंदे व सचिन बाबर हे दोघे खंडाळा येथील खंडाळा सहकारी साखर कारखान्यात कार्यरत आहेत. गुरूवारी ते दुचाकीवरून (एम. एच. 11 बीटी 9602) कामावर निघाले होते. त्यांची दुचाकी महामार्गावरील कवठे (ता. वाई) गावच्या हद्दीतील हॉटेल सागरसमोर आली असता

पाठीमागून भरघाव आलेल्या वॅगन आर कारने (एम. एच. 03 एएफ 5350) दुचाकीला धडक दिली. ती एवढी जोरात होती की, सचिन शिंदे कारवर आदळून पुन्हा सेवा रस्त्यावर फेकले गेले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सचिन बाबर गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालक पळून गेला असता त्याला कवठे (ता. वाई) येथील राजेंद्र डेरे, उदय पोळ व राहुल पिसाळ यांनी पाठलाग करुन पकडले.

अपघाताची नोंद भुईर्ंज पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी कार ताब्यात घेतली. चालक बशीर खाजी यास अटक केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर. झेड. कोळी करत आहेत.

No comments

Powered by Blogger.