धोमच्या पाण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक


कोरेगांव : पाणी वाटप धोरणात सातत्याने हस्तक्षेप करुन धोमचे पाणी पळविणार्‍या फलटण तालुक्यातील नेत्यांच्या व त्यांना मदत करणार्‍या अधिकार्‍यांच्या मनमानी विरोधात धोम पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार पासून सुरु असलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या शिष्ठाईनंतर मागे घेण्यात आले. दरम्यान, धोम पाणी वाटप प्रश्‍नी येत्या मंगळवारी मंत्रालयात संबंधित अधिकार्‍यांसमवेत बैठक होणार असल्याचे स्वत: ना. पाटील यांनी दूरध्वनीवरुन आंदोलनकर्त्यांना सांगून याच बैठकीत ठोस निर्णय जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले.

धोम पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोरेगाव, सातारा, जावली, वाई तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने मंगळवार दि. 15 पासून येथील तहसील कार्यालयासमोर संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके, पृथ्वीराज बर्गे व शंकर कणसे हे तिघे आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या समवेत कोरेगांव तालुक्यातील कार्यकर्ते साखळी पद्धतीने उपोषण करत होते. पहिल्या तीन दिवसांत विविध गावच्या शेतकर्‍यांनी तसेच विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनाची तीव्रता वाढवली होती.

तिसर्‍या दिवशी उपोषणकर्त्यांपैकी पृथ्वीराज बर्गे व शंकर कणसे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्या दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. आंदोलकांची प्रकृती खालावल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात वार्‍यासारखी पसरल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांनी कोरेगावकडे धाव घेतली. आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारारोड येथील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सातारारोड बंदची हाक दिली होती. व्यापारी, उद्योजक, नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देत संपूर्ण सातारारोड शहर बंद ठेवले होते.

ना. चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली, त्याच दरम्यान स्वत: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवर संपर्क करुन धोम पाणी प्रश्‍नी येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन हा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली लावण्याची ग्वाही दिली, त्यासाठी त्यांनी स्वत: आंदोलनकर्त्यांशी चर्चाही केली. मंत्री पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेचे आंदोलनकर्त्या संघर्ष समितीने स्वागत करुन उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

उपोषणकर्ते रणजित फाळके, पृथ्वीराज बर्गे व शंकर कणसे या तिघांनाही तहसीलदार जयश्री आव्हाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे, भानुदास बर्गे, भरत मुळे, तालुका अध्यक्ष संतोष जाधव, रमेश उबाळे, सोपानराव गवळी, शहर अध्यक्ष राहुल बर्गे, श्रीकांत बर्गे यांच्या उपस्थितीत सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, नंदकुमार माने-पाटील, विश्‍वासराव चव्हाण, तात्यासाहेब डेरे, अ‍ॅड. रोहिदास बर्गे, अर्जुनराव भोसले, एस. के. माने, महादेव भोसले, राजेश बर्गे, उत्तमराव बर्गे, जगदीश पवार, रमेश ओसवाल, अमित ओसवाल, विलासराव फाळके, रमेश माने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.