माझ्यावर ‘प्रेम’ करणार्‍यांना घरी बसवणार


लोणंद : दुष्काळी खंडाळा व फलटण तालुक्यासाठी कष्टाने आणलेल्या निरा-देवघर प्रकल्पाच्या पाण्याला वाटा फुटू लागल्या असल्या तरी हे पाणी शेवटच्या टोकापर्यत नेण्याचेच आपले शेवटचे ध्येय आहे. परंतु, याच पाणी प्रश्‍नावरून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारी मंडळी वाढली आहेत. पण या लोकांना घरी बसविल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. दरम्यान, 1995 ला तुमच्याकडे मते मागायला आलो होतो. आता 2019 लाही तुमच्याकडे पुन्हा मते मागायला येणार आहे, अशा शब्दात रामराजेंनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.मोर्वे, ता. खंडाळा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, कृषी सभापती मनोज पवार, शिवाजीराव काळे, डॉ. नितीन सावंत, नितीन ओहाळ, सरपंच सौ.मिनाक्षी धायगुडे, निमंत्रक नंदकुमार धायगुडे व मान्यवर उपस्थित होते.

ना. रामराजे म्हणाले, दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्यासाठी आपण 1995 ला मते मागितली होती. आता 2019 ला निरा-देवघर व धोम -बलकवडी या दोन्ही प्रकल्पाचे पाणी वंचित गावांना व शेवटच्या टोकापर्यत नेण्यासाठी मते मागणार आहे याची जाणीव ठेवावी. मोठ्या कष्टाने आणलेल्या पाण्याला वाटा फुटू लागल्या आहेत. यामुळेच माझ्यावरही प्रेम करणार्‍या मंडळींची संख्या वाढली आहे. त्यांना मी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे पाणी मिळण्यासाठी तुम्ही साथ दिली पाहिजे.आगामी काळात नको ते लोक सत्तेवर पुन्हा आल्यास पाणी मिळणार नाही तर गावागावात विकास होणार नाही. त्यासाठी गावागावांतील नेत्यांनी एकमेकांचे पाय ओढायचे थांबवावे आणी शरद पवार यांच्या विचाराला साथ द्यावी. तर पूर्वीप्रमाणे एकाने शब्द दिल्यास तो संपूर्ण गावाने पाळण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी असेही ना. रामराजे म्हणाले.

आ. मकरंद पाटील म्हणाले, मोर्वे गावाच्या विकास कामांना आजपर्यंत सहकार्य केले आहे. यापुढेही आपण सहकार्य करणार आहे. आम्ही तुमचा शब्द खाली पडू दिला नाही. गावानेही राष्ट्रवादीच्या मागे आगामी निवडणुकीत ठामपणे उभे राहून शब्द खाली पडू देऊ नका. निरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यत पोहोचण्यासाठी मोर्वे गावाचे मोठे योगदान आहे. नंदकुमार धायगुडे यांनी प्रास्ताविक केले. अमोल जगताप यांनी आभार मानले. यावेळी जयराम पडळकर, मल्हारी जगताप, पंडित जगताप, ज्ञानेश्‍वर धायगुडे, अशोक धायगुडे, राहुल धायगुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.