जिल्ह्यात वळीव पावसाचा तडाखा


दहिवडी : सातारा जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारी दुपारी वळीव पावसाने तडाखा दिला. माण तालुक्यातील किरकसाल व गोंदवले खुर्द येथे झालेल्या पावसाने नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. काही भिंती कोसळल्या व अन्नधान्याचे असे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. तर खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथेही गारांचा पाऊस झाला. यामुळे बाजारपेठेतील मोठमोठी होर्डिंग्ज व फ्लेक्स कोलमडून पडले. कोरेगाव व बामणोलीलाही गारांनी झोडपून काढले.


जिल्ह्यात काही ठिकाणी वळिवाचे वातावरण तयार झाले आहे. माण तालुक्यातील किरकसालमध्ये गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले होते, तसेच पाऊसही झाला. या पावसात विठ्ठल काटकर यांच्या घरावरील पत्रा उडून भिंती पडल्या. यामध्ये सौ. अविता काटकर, वरद काटकर, श्‍वेता भोसले हे जखमी झाले. याचबरोबर सदाशिव रघुनाथ काटकर, आक्काताई काटकर, बाळकृष्ण काटकर, निवृत्ती काटकर, संपत काटकर, हणमंत काटकर या सर्वांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. तर मारुती अवघडे यांच्या घराची कौले पडली. हणमंत चव्हाण यांचे पावसामुळे मांडवाचे कापड फाटले. तर 10 क्विंटल धान्य व 125 क्विंटल कांद्याचेही नुकसान झाले.

या पावसामुळे वीज वितरण कंपनीच्या 12 विद्युत पोलचे नुकसान झाले. काही ठिकाणी पोल पडल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या. तर वादळी वार्‍यामध्ये वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे किरकसालचा विद्युतपुरवठा काही काळ खंडित झाला होता. दरम्यान, गोंदवले खुर्द येथेही दुपारी 3 च्या सुमारास वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. हा पाऊस फक्त 10 ते 15 मिनिटेच पडला. वार्‍यामुळे गावातील 7 वृक्ष उन्मळून पडले. झाडे पडल्याने विद्युत वाहक तारा पडल्या. यामुळे येथेही विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. वादळी वार्‍यामुळ राजेंद्र माने व पांडूरंग पोळ यांच्या जनावराचा गोठ्यावरील पत्रा उडून पडला.

शिरवळला गारांचा वादळी पाऊस

खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी गारांच्या पावसाने नागरिकांची एकच धांदल उडाली. वादळी वार्‍यामुळे शिरवळ बसस्थानक परिसरातील जाहीरातीचे मोठे फलक वाकले. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे सुरु झाले. अचानक गारांची बरसात होत सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. यामुळे शिरवळमध्ये नागरिकांची धांदल उडाली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणी जाहिरातीचे मोठे मोठे होर्डींग वाकले व बॅनर फाटले. गारांच्या तडाख्याने टोमॅटो पिकासह आंब्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांना डबक्याचे स्वरूप आले होते. तर बाजारपेठेत भाजीपाला विक्रेते व नागरिक यांची दैना उडाली. शिरवळसह शिंदेवाडी ते पंढरपुर फाटया दरम्यान काही वेळ पाऊस झाला

बामणोली परिसरात दुपारनंतर वादळी वारा, विजेचा कडकडाट होऊन गारांचा पाऊस झाला. या पावसाने बामणोली, तापोळा,कांदाटी खोरे या संपूर्ण परिसराला अवकाळी आलेल्या मुसळधार पावसान झोडपून काढले. या पावसामुळे कोठेही नुकसान झाले नाही. गारा पडत असल्याने बालचमुनी गारा खाण्यासाठी एकच झुंबड उडवली. अचानक आलेल्या पावसाने लग्न समारंभ, क्रिकेटचे सामने यात पूर्ण व्यत्यय आला. या पावसामुळे कांदाटी खेार्‍यात असणारा रानमेवा धोक्यात आला आहे.

सुर्ली, वाठार किरोली येथे सोसाट्याच्या वार्यासह पाउण तास गारांचा पाउस. गारपिठीने झाडांचे आंबे गळतीसह फळबाग, मानमळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गुरूवारी दुपारी दक्षिण कोरेगाव भागात जोदार वादळी वारे व विजांच्या कडकडाटामत अर्धा तास गारपीट झाली. या पावसामुळे सुर्ली, आर्वीसह वाठार किरोली पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या आंबा, केळी, पपई बागांसह पानमळे व ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे रहिमतपूर ते सुर्ली या रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तब्बल अर्धा तास गारपीट झाल्याने सर्वत्र गारांचा खच पडला होता. या गारपीटॅमुळे ऊस, केळी, पपईचे नुकसान झाले. तर लगडलेली फळेही गळून पडली. काढणीला आलेला आंबा गेल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. याचबरोबर फुलशेती व पानमळ्यांचेही नुकसान झाले. जोरदार वार्‍यामुळे काही घरांवरील पत्रे उडून पडले. तर जनावरांसाठी ठेवलेला कडबा गंजी लावण्याअगोदर भिजून गेला.
कराड परिसरात वादळी पाऊस; पाटण परिसराला झोडपले

शुक्रवारी दुपारी वादळी पावसाने कराड शहर परिसराला झोडपून काढले. दिवसभर उकाड्याने हैराण झालेली जनता या पावसाने सुखावली. पंधरा-वीस मिनिट पाऊस कोसळला. यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत होता. आभाळ भरून येत होते; मात्र पाऊस काही पडत नव्हता. गुरुवारी दुपारनंतर आभाळ भरून आले. साडेचारनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यात बहुतेक सर्व भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.

या पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले. विजांच्या कडकडाटांसह आलेल्या पावसामुळे काही काळासाठी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. गुरूवारी कराड आठवडी बाजाराचा दिवस असल्याने येथील संभाजी मार्केटमध्ये शेतकरी शेत माल घेऊन विक्रीसाठी आले होते. वादळी पावसाने मंडईत शेतकर्‍यांची दैना उडाली.

पाटण : पाटण शहरासह परिसरातील गावांना गुरुवारी दुपारी वादळी वार्‍यासह पावसाने झोडपले. अचानक या पावसामुळे शेतकरी व वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. लग्न तिथी असल्याने वर्‍हाडी मंडळींची त्रेधा तिरपिट उडाली.
गुरूवारी वातावरणात कमालीची उष्णता वाढली होती. उष्णतेचा पारा वाढल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणामही जाणवत होता. तर लग्नसराई असतानाही या उष्णतेचा व्यापारी बाजारपेठांमध्ये परिणाम झाला. दुपारी विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. यामध्ये आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर मातीच्या विटा तयार करणार्‍या वीटभट्टी मालकांनाही या पावसामुळे लाखो रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले. महत्वपूर्ण तिथी असलेल्या याच काळात आलेल्या या पावसामुळे नवरा, नवरीसह वर्‍हाडी मंडळीची त्रेधा उडाली. दरम्यान पावसामुळे कोठेही पडझडीच्या घटना घडल्या नसल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

No comments

Powered by Blogger.