जिल्ह्यात पाण्याची टंचाई


सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 41 अंशाच्यावर तापमान नोंदवले गेले आहे. तसेच दिवसेंदिवस पाण्याची टंचाईही भासू लागली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील 12 गावे व 28 वाड्यांमध्ये टंचाईची भीषणता वाढली असून पाण्यासाठी या गावांची तडफड होत आहे. सुमारे 12 हजार 603 नागरिकांना 11 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.सातारा जिल्ह्यात माण- खटावसह अन्य तालुक्यात जलयुक्त शिवारमार्फत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत.

 तसेच परतीच्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले होते. त्यामुळे मार्चअखेर जिल्ह्यात एकाही गावात टँकर सुरू नव्हता. मात्र दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असल्याने सर्वत्र उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. असह्य उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होवू लागले आहे. काही ठिकाणचे ओढे, नाले, विहिरी व तलावातील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून गावोगावी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

माण तालुक्यातील विरळी, पुकळेवाडी, पाचवड, वारूगड, मोगराळे, कुकुडवाड, जाधववाडी व महिमानगड या 8 गावांसह बागलवाडी, जमालवाडी ज. कापूसवाडी, लाडेवाडी, आटपाडकरवस्ती, शेळकेवस्ती, शिंगाडेवस्ती, पाटीलवस्ती, पवारवस्ती, जगतापवस्ती, साळुंखेवस्ती, गायदरा, मठवस्ती, खांडेवाडी, उगळेवाडी, गरडाचीवाडी, आमजाई, जाधववस्ती, निंबाळकरवस्ती, खालचा गोठा, वरचा गोठा, रामोशीआळी, चव्हाणवस्ती, शिवाजीनगर, मानेवाडी या 25 वाड्या-वस्त्यांमधील 10 हजार 78 नागरिकांना 7 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी 4 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

खटाव तालुक्यातील गारवडी व आवळेपठार (गारवडी) या गावातील 149 नागरिकांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील भंडारमाची व रामोशीवाडी येथील नागरिकांना एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी (भोसगाव) येथील 527 नागरिकांना व 489 जनावरांना एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील गारवडी, राजपुरी, तायघाट येथील गावातील 1 हजार 552 नागरिकांना व 489 जनावरांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाने 9 विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

जिल्ह्यात 12 गावे व 28 वाड्यांमधील 12 हजार 306 नागरिक व 599 जनावरांना 11 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने टँकरच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments

Powered by Blogger.