प्रेमविवाहानंतर काळोशीत कुटुंबीयांना मारहाण


सातारा : प्रेमी युगुलाने प्रेमविवाह केल्यानंतर चिडलेल्या मुलीच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी मुलाच्या कुटुंबीयांना  कुर्‍हाड, लाकडी दांडक्याने ‘सैराट’ होत बेदम मारहाण केल्याची घटना सातारा तालुक्यातील काळोशी  येथे घडली. दरम्यान, या घटनेने गावात तणावाचे वातावरण असून सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मण लामजे, सूरज लामजे, पंकज लामजे, ऋषिकेश शेलार, अनिकेत डफळ, प्रवीण लोंढे यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमोल उत्तम निकम (रा. काळोशी) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदारासह चौघे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तक्रारदार यांच्या भावाने संशयित लक्ष्मण लामजे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला आहे. या घटनेची माहिती लामजे कुटुंबिय व नातेवाईकांना समजल्यानंतर बुधवारी रात्री अकरा वाजता संशयितांनी कुर्‍हाड, लाकडी दांडक्याने निकम कुटुंबियांवर हल्ला चढवला. या घटनेने निकम कुटुंबिय हादरुन गेले असून हल्ल्यात एका महिलेसह चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर घटनेची माहिती समोर आली. दरम्यान, जखमींनी प्रेमविवाह करण्यास पाठींबा दिल्याने चिडून मारहाण झाली केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सातारा तालुका पोलिसांनी रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती आवाक्यात आणली. रुग्णालयातून तक्रार दिल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत.

No comments

Powered by Blogger.