Your Own Digital Platform

पोहायला शिकताना चिमुरड्याचा मृत्यू


कोरेगाव :  विहिरीत वडिलांसमवेत पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोरेगाव येथे घडली. पाठीवरील बांधलेला कॅन सुटल्याने आठ वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागले आहेत. वेदांत दीपक सोनावणे (वय 8, रा. भगवा चौक, कोरेगाव) असे या चिमुरड्याचे नाव आहे.

याबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, दीपक सोनावणे यांचे गाव गारूडी (डिस्कळ) ता. खटाव हे असून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत.शिक्षणासाठी त्यांची पत्नी व दोन मुले कोरेगाव भगवा चौक येथे नातेवाईकांच्या शेजारी भाड्याने खोली घेवून वास्तव्यास आहेत. दीपक हे तीन दिवसांपूर्वीच सुट्टी काढून गावी आले आहेत. शनिवार दि. 26 रोजी मुलगा वेदांत याला घेवून घोल डगरी नावाच्या शिवारातील शिंदे यांच्या विहिरीवर पोहायला शिकवण्यासाठी ते गेले होते. वेदांतच्या पाठीला प्लास्टीकचा कॅन बांधून पोहण्यासाठी त्याला विहिरीत सोडले होते.

 त्याच्या समवेत आणखीन सात ते आठ मुले पोहत होती. मात्र या गडबडीत वेदांतच्या पाठीवरील कॅन सुटून तो विहिरीत बुडाला. सुमारे पाच मिनिटांनंतर ही बाब दीपक यांच्या लक्षात आली. त्यानंतर बराच प्रयत्न करून वेदांतला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने उपचारासाठी कोरेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेदांत याच्यावर त्याच्या गावी गारूडी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने भगवा चौक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याबाबतची फिर्याद अभिजीत सुरेश अहिरे यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दिली असून पोलिस ह. गोसावी अधिक तपास करत आहेत.