श्रमदानाची किमया न्यारी; जलसंधारण लयभारी


म्हसवड : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही सातारा जिल्ह्यातील माण-खटाव हा भाग दुष्काळी म्हणून गणला जातो. तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागते. हाच धागा घेऊन ‘सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन’ या संस्थेने माणमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेतली आहे. एकट्या माण तालुक्यात तब्बल 66 गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू आहेत. दिवसरात्र लोक श्रमदान करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. फाऊंडेशनच्या सदस्यांचे मार्गदर्शन, लोकांचे श्रमदान आणि मिळणारी मदत यातून प्रत्येक गाव आपलं भाग्य लिहायला लागल आहे. 42 दिवस चालणारी ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे इर्षेने प्रत्येक गावात श्रमदान होत आहे. स्पर्धेच्या निकालाअंती कोणत्याही गावाचा क्रमांक येईल. मात्र, या स्पर्धेच्या माध्यमातून लोकांच्या मनाचे संधारण होऊन गावाची दुष्काळमुक्‍तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत 24 जिल्ह्यांतील 75 तालुक्यांमध्ये ही दुष्काळमुक्‍तीची चळवळ सुरू आहेे. गेले 42 दिवस 4 हजार गावे सहभागी झाले आहेत. कायम दुष्काळी माण तालुक्यातील 105 पैकी 66 गावे मोठ्या तयारीनिशी या स्पर्धेत उतरली आहेत. ‘गाव हे आपुलं, आपण सारे, मिळुनी सुंदर करायचं झालं गेलं ते विसरून सारं गावाचा विकास करायचं’ या कवितेच्या पंक्‍तीनुसार गावातील राजकारण गट-तट, जाती-पाती मतभेद गावाच्या उंच डोंगरावर ठेवून गाव पाणीदार व राज्य दुष्काळमुक्‍त करण्यासाठी झपाटलेले आहेत.

माण-खटाव तालुके हे कायम दुष्काळी तालुके . दुष्काळ हा येथील जनतेच्या पाचवीलाच पूजलेला. या दुष्काळामुळे तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भाबडेपणा आणि अंधश्रद्धा कायमच्या बोकांडी बसलेली सोशिक व प्रामाणिक जनता स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही भोगतच राहिली. दुष्काळाला केवळ निसर्गच जबाबदार आहे. पिळवणूक करणारी प्रचलित व्यवस्थाही कारणीभूत आहे. दमडी भावाने शासनाच्या टँकरवर पिण्याच्या पाण्यासाठी तुटून पडतो. या भयावह व विदारक परिस्थिती दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या माणच्या जनतेच्या मनात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने पहाट उगवली व या स्पर्धेसाठी माण तालुक्यातील 66 गावांनी सहभाग नोंदवून राज्यात उच्चांक केला आहे. दररोज सकाळी भल्या पहाटे उठून गावातील गावकरी मंडळी, महिला, तरूण, वृद्ध हातात फावडी, खोरी, टिकाव, घमेली, पाण्याच्या बाटल्या घेऊन डोंगर कपारीत शेत शिवारात गाव पाणीदार करण्यासाठी रक्‍ताचं पाणी करून गाव पाणीदार होऊन सुजलाम सुफलाम होण्याकरिता मातीशी दोन हात करत आहेत.

आपलं गाव पाणीदार करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या टीम काम करत आहेत. मोजमाप करणारी टीम आदल्या दिवशी जे काम करायचं आहे. त्या कामाचे नियोजन करतात. त्यानुसार लोक त्याठिकाणी श्रमदान करत असतात. या स्पर्धेसाठी 100 मार्काचा पेपर आहे. यामध्ये गावच्या लोकसंख्येच्या दुप्पट नर्सरी तयार करणे, प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सांडपाण्यासाठी शोषखड्डा काढले आहेत. शेतीतील मातीचे परीक्षण केले आहे.

आगपेटीमुक्‍त शिवार करणे, गावात वॉटर बजेट तयार करून दर्शनी भागात लावणे. शेतीसाठी शेतकर्‍यांनी ठिबक वापरणे तसेच डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी फाऊंडेशनच्या शिस्त व शास्त्र या तत्वानुसार अडवणे या कंपार्टमेंट बंडिंग बांधणे, माती बांध घालणे, बंडिंग, एलबीएस बंधारे, शेततळी ही कामे लोक सहभागातून केली जात आहेत. तर डीप सीसीटी ही कामे मशिनरीच्या सहाय्याने करण्यात येत आहेत.

माण तालुक्यात गत वर्षीच्या स्पर्धेत 30 गावांनी सहभाग घेतला होता. ज्या गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतले त्या बिदाल कारखेल अनभुलेवाडी यांसह अनेक गावात यावर्षी शेतकर्‍यांना सुगीचे दिवस आले असून कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. आदर्श गाव लोधवडे हे गाव राज्यासाठी आदर्श ठरले आहे. या गावाने आज 20 गावांना पाणीपुरवठा करेल, असे पाण्याचे बजेट केले आहे. यावेळी 105 पैकी 66 गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून 55 गावांमध्ये काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

पाणी फाऊंडेशनच्या शास्त्रानुसार जलसंधारणाची कामे सुरू आहेत.यामुळे पावसाळ्यात माण तालुक्याचे चित्र पालटणार असून माणचे रूपडं बदलणार हे निश्‍चित आहे. शुक्रवारी रात्री वडजलमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्याचे पाणी डोंगरावर केलेल्या डीप सीसीटी मध्ये अडवले जाऊन मुरल्याने ते पाणी निश्‍चितच भूगर्भात जाऊन गावाच्या शिवारात भविष्यात पडणारा पावसाचा पडणारा थेंब न थेंब अडला जाणार आहे.

No comments

Powered by Blogger.