नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरवात


कराड : पासपोर्ट काढताना लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, पोलिसांनी नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरवात केली आहे. यामुळे पासपोर्ट काढत असताना लोकांचा वेळ, पैसा वाचणार असून पोलिस ठाण्यातील हेलपाटे थांबले आहेत. यासाठी शासनाने पोलिसांना टॅब दिले असून त्यावर पोलिसांनी ‘एम पासपोर्ट पोलिस अ‍ॅप’ ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे लोकांमधून स्वागत होत आहे. पासपोर्ट काढणे म्हणजे प्रचंड त्रासाचे काम समजले जाते. पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत होते. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडे माहिती येते त्यावेळेस संबंधित व्यक्‍तीला पोलिस ठाण्यात बोलावून वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर उभे करून पडताळणी केली जात होती. काही वेळेस लोकांनाच पोलिस ठाण्यात येऊन आमची माहिती पडताळणीसाठी आली आहे का? अशी विचारणा करावी लागत होती. त्यामुळे पासपोर्ट मिळेपर्यंत लोकांना पोलिस ठाण्यात वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, अलिकडे हेच काम अधिकाधिक सोप करण्यासाठी तसेच लोकांचा त्रास कमी करण्यासाठी पोलिसांनी नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

लोकांच्या सोयीसाठी पोलिसांकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यापूर्वी फिरते पोलिस ठाणे, निर्भया पथक असे उपक्रम सुरु केली आहेत. तशाच प्रकारे ‘एम पासपोर्ट पोलिस अ‍ॅप’ पोलिसांनी सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ व पेपरलेस कामकाजातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व 28 पोलिस ठाण्यातील पासपोर्ट पडताळणी करणार्‍या पोलिसांना टॅबचे वाटप करून त्यांना सांगली व सातारा येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोकांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश 11 मे रोजी जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिले आहेत. त्यानुसार कराड पोलिसांनी लोकांना पोलिस ठाण्यात न बोलावत त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. रविवार दि. 13 रोजी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपीका जौंजाळ व उदय देसाई तसेच हवालदार गोवारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र देशमुख यांनी कराडमधीलच मार्केट यार्डमधील मिलींद नवले यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीच्या पासपोर्टसाठी पडताळणी केली. कराड शहर पोलिस ठाण्यात महिन्याला साधारणपणे 250 लोकांची पासपोर्टसाठी पडताळणी होत असते. त्यामुळे नवीन उपक्रमाव्दारे दररोज सुमारे 8 ते 10 लोकांच्या घरी जाऊन पोलिसांना पडताळणी करावी लागणार आहे.

पासपोर्ट काढणार्‍या व्यक्‍तीच्या घरी जाऊन नेमकी कोणती माहिती घ्यायची आहे? याचे प्रशिक्षण पोलिस कर्मचार्‍यांना दिले आहे. घेतलेली माहिती ‘एम पासपोर्ट पोलिस अ‍ॅप’व्दारे पोलिस ठाण्यातील मुख्य संगणकावर त्वरीत दिसणार आहे. घरात बसून पासपोर्ट संबंधी पडताळणी केली जाणार असून तेथील लोकेशन त्वरीत पासपोर्ट ऑफिसला कळणार आहे. त्यामुळे ते राहत असलेले घर कोणाचे आहे? पासपोर्ट ऑफिसला अर्ज करताना दिलेली माहिती बरोबर आहे का? याशिवाय ओळखपत्राबाबत माहिती घेतली जाणार आहे.

तसेच घरी जाऊन सहीचा नमुना व फोटो घेतले जाणार असल्याने लोकांना पासपोर्ट काढणे सोपे झाले आहे. लोकांची कागदपत्र बरोबर व खरी असतील तर त्यांना कोणताच त्रास होणार नाही. यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसणार आहे. तसेच लोकांनी घरी बसून पासपोर्टसाठी सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर साधारणपणे 21 दिवसात पासपोर्ट मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी पासपोर्ट कार्यालयाकडून मेल किंवा मोबाईलवरील मेसेजव्दारे सुचना मिळणार असून कोठेही न जाता घरबसल्या पासपोर्ट मिळणार आहे. यातून लोकांचा त्रास कमी झाला असून पोलिसांचे काम वाढले आहे. यामुळे पासपोर्टसाठी पोलिस ठाण्यात होणारी गर्दी कमी होणार असून पोलिसांच्या या उपक्रमाचे लोकांमधून जोरदार स्वागत होत आहे.

No comments

Powered by Blogger.