बीट मार्शलच्या दुचाक्या उन्हातान्हात धुळखात


सातारा : सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांचे सत्र सुरु झाले आहे. दुचाकी चोर्‍यांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. सदैव गस्तीवर असणारी या दोन्ही पोलिस ठाण्याची ‘बीट मार्शल’च बंद असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली असून बीट मार्शलच्या दुचाक्या उन्हातान्हात धुळ खात पडलेल्या आहेत. दरम्यान, वारंवार चोरीच्या घडणार्‍या या घटनांमुळे सातारकर भयभीत झाले असून तत्काळ  पोलिस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.सातारा शहरामध्ये मुख्य बाजारपेठ, बँकींग एरिया, मुख्य शासकीय कार्यालये, निवासस्थाने यासह राष्ट्रीय महामार्ग व त्या खालील उपनगरांचाही समावेश आहे. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाणे आहे. गेल्या पाच वर्षापासून शहरासह परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस कंट्रोल रुमची ‘पीसीआर’ व्हॅन तसेच त्या त्या पोलिस ठाण्याच्यावतीने ‘बीट मार्शल’ पोलिसांद्वारे पोलिस गस्त घातली जात आहे. पीसीआरसाठी प्रशस्त चारचाकी व्हॅन असून यामध्ये किमान चार ते पाच पोलिस कायम असतात. याशिवाय बीट मार्शलसाठी अद्यावत दुचाकी असून त्यावर दोन पोलिसांची नियुक्‍ती केलेली आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यासाठी चार बीट मार्शल अशाप्रकारे आठ पोलिस कर्मचारी तर शाहूपुरी पोलिस ठाण्यासाठी तीन बीट मार्शल असे सहा पोलिस गस्त घालत होते. दोन्ही पोलिस ठाण्याचे मिळून एकट्या बीट मार्शलसाठी 14 पोलिस बंदोबस्तासाठी कायम तैनात होते. याशिवाय पीसीआर व्हॅनची वेगळी गस्त या माध्यमातून सातार्‍यात नेहमी  राबवली जात होती. दुर्देवाने मात्र सातारा शहर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल बंद असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे शाहूपुरी पोलिस ठाण्याचीही तशीच अवस्था असून बीट मार्शलसाठी सहा पोलिसांऐवजी कधी दोन तर कधी चारच पोलिस उपलब्ध राहत आहेत.
सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा माहोल आहेे. यामुळे नागरिक फ्लॅट, घरे बंद करुन पाहुण्यांसह फिरायला जात आहेत. सातार्‍यात पोलिस गस्तीच बंद असल्याने चोरट्यांचे फावले आहे. बंद घरे, फ्लॅट एकामागून चोरटे टार्गेट करुन चोरी करत आहेत. चोरीच्या माध्यमातून लाखोंचा ऐवज चोरीला जात आहे. या बहुतेक चोर्‍या मध्यरात्री ते पहाटे तसेच भरदिवसाही  होत असल्याचे वास्तव आहे. सातार्‍यात सीसीटीव्हीचाही कमालीचा अभाव आहे. यामुळे सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी चोरट्यांकडून डल्‍ला मारण्याचे उद्योग ज्यादा प्रमाणात वाढलेले आहेत.
एरव्ही, बीट मार्शलमुळे पोलिस सदैव दुचाकीवर असायचे. पोलिसांची दुचाकी दिसली की अनेक अघटीत घटना घडण्यावरही नियंत्रण येत होते. आता मात्र बीट मार्शल संकल्पनाच बंद असल्याने सातारकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
‘मॅनपॉवर’च्या अभावामुळे बीट मार्शल बंद...
सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये कर्मचार्‍यांची संख्या कमालीची अपुरी आहे. मंजूर पदांपेक्षाही पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने जनरल कामासाठी पोलिस यंत्रणा राबवली जात आहे. यामुळे बीट मार्शलसाठी पोलिस उपलब्ध होत नाही. दरम्यान, गतवर्षी पोलिसांचे जनरल गॅझेट झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील अनेक पोलिसांच्या बदल्या झाल्या. त्यानुसार पोलिस शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी रिलीव्हही झाले. त्या बदल्यात दुसर्‍या पोलिसांना सातारा शहर पोलिस ठाणे नियुक्‍तीसाठी देण्यात आले. दुर्देवाने शहरचे पहिले पोलिस बदलून गेले मात्र नवे पोलिस हजर झाले नसल्याचे वास्तव आहे. यामुळे शहर पोलिस ठाण्याचा गोंधळात भर पडत आहे.
पीसीआर पोलिस ठाण्याचे ऐकत नाही...
पीसीआर व्हॅन व त्यावरील पोलिस हे थेट पोलिस मुख्यालयाच्या अंडर येतात. पीसीआरला कंट्रोल रुमचा ‘कॉल’ मिळाल्याशिवाय ते हालत नाहीत. आणीबाणीच्या प्रसंगातही शहर किंवा शाहूपुरी पोलिसांनी थेट पीसीआरला फोन केला तर तुम्ही मुख्यालयाला फोन करा, त्यांनी आम्हाला सांगितले तरच जातो, अशी उत्तरे दिली जातात. बीट मार्शल बंद असल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचारी कंट्रोल रुमला व कंट्रोल रुम पीसीआरला कळवते, अशी सध्या पध्दत सुरु आहे.
गस्तीची संकल्पना बंद पडण्याच्या मार्गावर..
तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दिमाखात पीसीआर, बीट मार्शल या संकल्पना राबवून त्या कार्यान्वित करण्यात आल्या. आजही पीसीआरच्या माध्यमातून एखाद्या घटनेनंतर सातारा पोलिस पीसीआरच्या माध्यमातून 10 ते 15 मिनिटांत पोहचतात. मात्र बीट मार्शलसारखी संकल्पना गेल्या काही महिन्यांपासूनच बंद असल्याचे समोर आल्याने भविष्यात पीसीआरच्या बाबतीतही असेच होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

No comments

Powered by Blogger.