वाहतूकीची प्रचंड कोंडीमुळे शहरात नवीन दोन सिग्‍नल


कराड : वाहतूकीची होणारी प्रचंड कोंडी व वाहतूकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने नगरपालिकेकडून कराड शहरात नव्याने दोन सिग्‍नल सुरू करण्यात येत आहेत. मात्र ज्याठिकाणी सिग्‍नल सुरू करण्यात आले त्याठिकाणीच व्यवसायिकांचे व्यवसाय सुरू आहेत. बसस्थानकासमोरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याशेजारी असणार्‍या सिग्‍नलजवळच व्यवसाय सुरू असतात. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होत असुन अपघातास निमंत्रण मिळत आहे. हे असं चित्र केवळ कराडमध्येच घडू शकतं अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. याबाबत पालिका व पोलिस प्रशासन गप्प असल्याबाबत नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. सिग्‍नलपासून 100 फुट अंतरावर दुकाने, विक्रेते, गाडे अशी अतिक्रमणे नसावीत असा नियम आहे. मात्र सध्या बसस्थानकासमोर ज्याठिकाणी सिग्‍नल सुरू करण्यात येत आहे. त्याठिकाणी प्रचंड प्रमाणात अतिक्रमणे आहेत. याठिकाणची अतिक्रमणे ही अनेक वर्षापासूनची डोकेदुखी आहे असे असतानाच आता सिग्‍नलच्या खांबालाच लागून फिरत्या विक्रेत्यांनी आपले गाडे थाटले आहेत. त्यामुळे या गाड्यावरचे खाद्य पदार्थ घेण्यासाठी याठिकाणी गर्दी होते त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. तर याच ठिकाणी रिक्षा वाले आपल्या रिक्षा लावतात. त्यामुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी होते. सिग्‍नलशेजारीच रिक्षा लावून रिक्षावाले प्रवाशी भरत असतात. परिणामी याठिकाणी गर्दी होत असते. आधीच या सिग्‍नलला अतिक्रमणांचा वेढा असताना पुन्हा याठिकाणी व्यवसायही सुरू असल्याने वाहनधारक, नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

बसस्थानकासमोर होणार्‍या नवीन सिग्‍नलजवळ झोपडपट्टी, विविध वस्तु विक्रेते, भाजी मंडई, खाद्य पदार्थांचे गाडे आदींचे प्रचंड अतिक्रमण आहे. फिरत्या विक्रेत्यांच्याबाबतीत पालिकेने ठोस कारवाई करावी याबाबत अनेकदा निवेदने देवून झाली. मात्र ठोस कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत केला जात आहे. अतिक्रमण काढण्याचा पालिकेकडून केवळ फार्स केला जात आहे. सिग्‍नलमुळे वाहतूकीला शिस्त लागण्याऐवजी बेशिस्तीचे चित्र जास्त प्रमाणात दिसत आहे. यावर पालिका, पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.