आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

कराडात डॉक्टरसह पाच जणांना सक्‍तमजुरी


कराड : बेकायदेशीर लॅबोरेटरी चालविणारे चार तंत्रज्ञ व त्यांना मदत करणारे एक पॅथॉलॉजिस्ट अशा पाच जणांना एक वर्ष साधी कैद, दोन वर्षे सक्‍तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अधिकार नसताना रिपोर्ट देणे व कोर्‍या लेटरहेडवरील सह्यांचा वापर करून रिपोर्ट दिल्याने सामान्य नागरिकांची फसवणूक, तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्टमधील तरतुदीप्रमाणे कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश आर. टी. घोगले यांनी ही शिक्षा सुनावल्याचे सहायक सरकारी वकील ना. बी. गुंडे यांनी सांगितले. जितेंद्र सर्जेराव शिबे (रा. शिबेवाडी), नारायण आनंदा चव्हाण (रा. साजूर, ता. कराड), दीपक शशिकांत काळे (रा. आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड), शशांक हार्डीकर (रा. कराड) व डॉ. एम. बी. पवार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तर संजय उत्तमराव गायकवाड (रा. परभणी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत अ‍ॅड. ना. बी. गुंडे यांनी सांगितले की, फिर्यादी संजय गायकवाड हे कामानिमित्त कराडला आले असता त्यांना लघवीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी ‘लाईफ लाईन लॅबोरेटरी’मध्ये लघवीचा नमुना तपासणीसाठी दिला. सदर लॅबोरेटरी चालविणारे जितेंद्र शिबे व नारायण चव्हाण यांनी प्रत्यक्ष पॅथॉलॉजिस्ट न नेमता जितेंद्र शिबे यांनी स्वत: सही करून रिपोर्ट दिले. त्यामुळे संजय गायकवाड यांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा काळे लॅबोरेटरी यांच्याकडे लघवी तपासणीसाठी नमुना दिला. त्यावेळी पॅथॉलॉजिस्ट डॉ. एम. बी. पवार यांच्या सहीचा रिपोर्ट लॅबचालक दीपक काळे यांनी संजय गायकवाड यांना दिला.

त्यावेळी गायकवाड यांनी डॉ. पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली असता डॉ. लॅबोरेटरीमध्ये नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सदर लॅबोरेटरीमध्ये प्रत्यक्ष पॅथॉलॉजिस्ट हजर नसताना रिपोर्ट दिल्याची खात्री झाल्याने या रिपोर्टबाबतही गायकवाड यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी हार्डीकर लॅबोरेटरी येथे जाऊन पुन्हा लघवीचा नमुना तपासणीस दिला. तेथेही थोड्यावेळाने हर्डीकर लॅबचालक शशांक हर्डीकर यांनी स्वत:चे व डॉ. एम. बी. पवार यांच्या सहीचे रिपोर्ट दिले. त्यावेळीही गायकवाड यांनी डॉ. पवार यांना भेटण्याची विनंती केली असता ते लॅबोरेटरीमध्ये नसल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. त्यामुळे शंका आल्याने संजय गायकवाड यांनी सर्व संबंधितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विवेक पाटील यांनी त्याचा तपास करून डॉ. एम. बी. पवार यांना वगळून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, तपासाबाबत समाधान न झाल्याने फिर्यादी संजय गायकवाड यांनी पुन्हा तपास करण्याची विनंती केली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी अधिक तपास करत डॉ. एम.बी. पवार यांनी कोर्‍या लेटरहेडवर सह्या करून त्याआधारे रिपोर्ट देण्यास बेकायदेशीररित्या सहाय्य केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे डॉ. पवार यांच्यासह इतरांवर पुन्हा पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले.

जितेंद्र शिबे व नारायण चव्हाण यांनी अधिकार नसताना रिपोर्ट दिला. तर दीपक काळे व शशांक हर्डीकर यांनी डॉ. एम. बी. पवार यांनी दिलेल्या कोर्‍या लेटरहेडवरील सह्यांचा वापर करून रिपोर्ट दिल्याच्या संशयापलिकडे गुन्हा शाबीत झाल्याचा केलेला युक्‍तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. भोगले यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पाचही संशयितांना सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याबद्दल प्रत्येकी 1 वर्षाची साधी कैद तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट 1961 मधील तरतुदीप्रमाणे प्रत्येकी 2 वर्षांची सक्‍तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

याप्रकरणामध्ये सहायक सरकारी वकील नितीन नारवाडकर व ना. बी. गुंडे यांनी काम पाहिले. अ‍ॅड. गुंडे यांनी सुनावणीदरम्यान वेगवेगळ्या वरिष्ठ न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ देत संशयितांना शिक्षेची मागणी केली. याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने एकूण 14 साक्षीदार तपासले. फिर्यादी संजय गायकवाड, डॉ. लांजेवार, अ‍ॅड. विजय पाटील, अ‍ॅड. शहा, डॉ. घोरपडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. याकामी पो. कॉ. धनंजय पाटील, व्ही. सी. गोवारकर, पो.ह. सुनीता मोरे, मच्छिंद्र सावंत यांनी सहकार्य केले.