कर्नाटकमध्ये निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल : खा. शरद पवार


सातारा : सध्या कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या ठिकाणी सत्तेत येण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला आहे. मात्र, काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात चांगले काम केले आहे. त्यांनी गोरगरिबांपर्यंत शासनाच्या सर्व योजना राबवल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकी जनतेचा काँग्रेसकडे ओढा आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी कर्नाटकमध्ये निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्‍त केला.स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त खा. शरद पवार सातारा दौर्‍यावर आहेत. मंगळवारी दुपारी सर्किट हाऊस येथे निवडक पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर, राजू भोसले, राजकुमार पाटील, सुधीर धुमाळ उपस्थित होते.

यावेळी खा. पवार म्हणाले, कर्नाटक निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना पाठवण्यात आले आहे. त्यांनी तेथील निवडणूकीचा पूर्ण आढावा घेतला आहे. तेथील जनतेशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसने चांगले काम केल्याचे दिसले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेससाठी चांगली परिस्थिती आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे आक्रमक असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कर्नाटकी जनतेसाठी विविध योजना राबवल्या. या योजना तळागाळात पोहचवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. तसेच जनतेचे प्रश्‍न त्यांनी योग्य पध्दतीने हाताळले आहेत. त्यामुळे तेथील बहुतांश जनता काँग्रेसच्या पाठिशी आहे. त्यांच्या या कामामुळेच पुन्हा एकदा निवडणूकीनंतर काँग्रेस सत्तेवर येईल. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रितपणे लढणार आहेत. त्यासाठी चर्चा सुरू असून ज्या ठिकाणी काही समस्या येतील त्या वरिष्ठ पातळीवर सोडवण्यात येतील.

भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी असल्याने या ठिकाणी कोणता उमेदवार द्यायचा याचे संपूर्ण अधिकार खा. प्रफ्फुल्‍ल पटेल यांना दिले आहेत. त्यानुसार ते तेथील उमेदवारीचा निर्णय घेतील. खा. पटेल यांची राज्यसभेची खासदारकीची 5 वर्षे शिल्‍लक आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत: या मतदारसंघात निवडणूक लढवू नये, अशा सूचना मी केल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार रिंगणात असणार आहे.

राज्य सरकारच्या धोरणामुळे साखर कारखानदारांची परिस्थिती बिकट झाली आहे. साखरेला भाव नसल्याने कारखानदारांचे पेकाट मोडले आहेे. तर साखरेचा उठाव होत नसल्याने गोडावून साखरेनी भरून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली असून काही कारखाने तोट्यात आले आहेत. विशेषत: ज्या साखर कारखान्यांची गाळप क्षमता कमी आहे व तेथे उप पदार्थ तयार होत नाही त्या कारखानदारांना मोठा तोटा होणार आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. अनेक साखर कारखाने तोट्यात आल्यानंतर सहकार धोक्यात येणार असल्याने खा. पवार यांनी साखर कारखानदारीबद्दल चिंता व्यक्‍त केली.

निवडणूकांमध्ये मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या इव्हीएम मशिनबाबत आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. बहुतांश पाश्‍चिमात्य देशांमध्ये इव्हीएम मशिन योग्य नसल्याने मतदानाची पध्दत बदलली आहे. त्यामुळे आपल्याकडे इव्हीएम मशिनवर मतदान घेण्यासंदर्भात फेरविचार व्हावा, अशी अपेक्षाही खा. पवार यांनी बोलून दाखवली.
यावेळी खा. शरद पवार यांनी विविध विषयांवर मनमोकळ्या व दिलखुलास गप्पा मारल्या.

आ. शिवेंद्रराजेंचा लूक टकाटक...

अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचे लक्ष आ. शिवेंद्रराजे यांच्या दाढीकडे वेधण्यात आले. तेव्हा शिवेंद्रराजेंचा लूक टकाटक झाल्याचे पवार कौतुकाने म्हणाले. फलटणचे कसे काय? असे त्यांनी रामराजेंना विचारले त्यावर साहेब, तुम्हाला माहीत आहेच की फलटणमध्ये ‘ऑल इज वेल’, राजधानीचे म्हणाल तर शिवेंद्रराजेंनाच विचारा. मला तरी काही अडचण वाटत नाही. रामराजेंच्या विधानावर पवार खळखळून हसले.

No comments

Powered by Blogger.