Your Own Digital Platform

स्टेडियम व्यायामशाळेतील साहित्य पडून


कराड :  चार रणजी क्रिकेट सामना खेळल्या गेलेल्या येथील शिवाजी स्टेडियमवर अनेक प्रकारचे खेळ, स्पर्धा होत असतात. स्टेडियम अद्ययावत व्हावे, यासाठी 2012 मध्ये 1 कोटी 20 लाख रूपयांचा निधी दिला होता. यामधून बास्केटबॉल, जिम्नॅशियम, व्हॉलीबॉल कोर्ट लांब उंडी, बॅडमिंटन कोर्ट आदींसाठी हा निधी वापरण्यात येणार होता मात्र, त्यापैकी काही कामे गेल्या 4 वषार्ंपासून प्रलंबित आहेत तर येथील व्यायामासाठी आणलेले साहित्य मात्र तसेच पडून आहे. गेल्या तीन वर्षापासून ही व्यायामशाळा सुरू व्हावी याची वाट नागरिक, खेळाडू पहात आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आधुनिकपध्दतीचेे स्टेडियममध्ये साहित्य खेळाडूंना मिळावे यासाठी निधीची उपलब्धता करून दिली होती. निधीचे पैसेही मिळाले मात्र त्यातील काही निधी वापरण्यात आला. या निधीमध्ये बॅडमिंटन कोर्ट करण्यात आले. तसेच बास्केटबॉलसाठीही निधी वापरण्यात आला. बास्केटबॉल व व्यायामासाठी नवीन मोठी इमारत बांधण्यात आली. अद्ययावत व्यायामाचे साहित्यही आणले मात्र अद्यापही ही व्यायामशाळा सुरू नाही. भरपूर जागा असणार्‍या या व्यायामाच्या हॉलमध्ये ही साधने एका बाजूला तशीच पडून आहेत. त्यामुळे खेळाडू, नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. व्यायामशाळेसमोरच व्हॉलीबॉलसाठीचे ग्राऊंड तयार करण्याचे काम काही दिवसांपासून पालिकेकडून सुरू होते मात्र हे काम आता बंद असून ग्राऊंड तयार झाले नाहीच केवळ व्हॉलीबॉलसाठीचे दोन खांब ठोकण्यात आले आहेत. त्याला व्हॉलीबॉल जाळीही नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊनही उर्वरित निधी गेला कोठे असा सवाल खेळाडूंमधून विचारला जात आहे.

याचबरोबर मैदान बंदिस्त नसल्याने खेळाडूंना असुरक्षित वातावरण झाले आहे. याठिकाणी ‘आवो जावो घर तुम्हारा’ अवस्था झाल्याने खेळाडूंचे साहित्य चोरीस जाण्याचे प्रकार घडत असून स्टेडियम मधील साहित्यावरही चोरट्यांची नजर असल्याने स्टेडियमची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. बाहेरून येणार्‍या खेळाडू स्पर्धकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सातत्याने अनेक स्पर्धा याठिकाणी होत असतात. कराडसह तालुक्यातून विविध शाळांच्या स्पर्धा तसेच जिल्ह्याबाहेरील खेळाडूही विविध स्पर्धांसाठी येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी चोरीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे खेळाडूंना साहित्य कोठे ठेवायचे असा प्रश्‍न पडतो. छोट्यामोठ्या वस्तु चोरीस जात असल्याने खेळाडू हैराण झाले आहेत. स्टेडियम जरी नागरिकांसाठी खुले असले तरी सकाळी व सायंकाळी याठिकाणी मॉर्निंगवॉक व सायंकाळी फिरायला जाणार्‍या नागरिकांची याठिकाणी गर्दी असते. मात्र यासाठी ठराविक नियमावली हवी. या नागरिकांमुळे अनेकदा खेळाडूंच्या सरावात अडथळा होत असल्याचेही अनेक खेळाडूंनी सांगितले.