सात लाखाची इनोव्हा दोन लाखात घेऊन एकाची फसवणूक


सातारा : टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स व्यवसायिकांबरोबर इनोव्हा कार विक्रीची चर्चा झाल्यानंतर 7 लाख 10 हजार रूपयांच्या व्यवहारापैकी केवळ 2 लाख 10 हजार रुपये देवून समीर इनामदार (रा.ओझर्डे ता.वाई) हा कार घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दत्तात्रय महादेव तोडकर (वय 31, रा.करंजे पेठ, सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, तक्रारदार दत्तात्रय तोडकर यांची इनोव्हा क्रमांक एमएच 11 एके 7547 आहे. ती कार विकायची असल्याने संशयित समीर इनामदार हा ती कार विकत घेण्यासाठी भेटला. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर इनोव्हा कार 7 लाख 10 हजार रूपयांचा दोघांमध्ये व्यवहाय ठरला. संशयित समीर याने दत्तात्रय तोडकर यांना त्याबदल्यात तीन टप्प्यात 2 लाख 10 हजार रुपयेही दिले.

दि. 7 फेब्रुवारी रोजी संशयित समीर इनामदार हा दत्तात्रय तोडकर यांच्या घरी गेला व त्याने इनोव्हा कार घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तोडकर यांनी व्यवहार अपूर्ण असून अद्याप 5 लाख मिळाले नसल्याचे सांगितले. त्यावर इनोव्हा कार कुटूंबियांना दाखवून आणतो, असे सांगून कारची किल्ली घेतली. कार घेवून गेल्यानंतर बराच वेळ झाला तरी समीर त्या दिवसभरात कार घेवून आलाच नाही.

फोनवरुन बोलणे झाल्यानंतर संशयित समीर याने बँकेचे चेक (धनादेश) देतो, असे सांगून दोन चेक दिले. मात्र ते दोन्ही चेक बँकेत वटले नाहीत. तक्रारदार दत्तात्रय तोडकर यांनी पुन्हा समीर याला फोन करून चेकबाबत सांगितले असता त्याने रोख रक्कम देतो, असे सांगून पुन्हा वेळ मागितली. अखेर 7 लाख 10 हजार रूपयांची इनोव्हा कार केवळ 2 लाख 10 हजार रुपयांना घेवून 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदार दत्तात्रय तोडकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दिली.

दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, गाडी विक्रीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

No comments

Powered by Blogger.