तारळे-मुंबई प्रवासी हजारो, एसटी एकच


तारळे : विभागातील हजारो लोक बारमाही मुंबई येथे ये—जा करत असतात. यासाठी जवळपास पाच ,सहा खासगी बस तारळेतून सायंकाळी मुंबईला जात आहेत पण एस टी महामंडळाची फक्‍त सकाळी एक गाडी मुंबईला जात आहे.तसेच रस्त्यांच्या विस्तीर्ण जाळ्यामुळे कमी वेळात प्रवासी मुंबईत पोहचत असल्याने रात्रीचा प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे. महामंडळाचे अधिकारी यातून काही बोध घेणार का? मिळकतीचे कारण पुढे करुन अनेक फेर्‍या कमी करणार्‍या महामंडाळाच्या अधिकार्‍यांकडून उत्पन्न देणार्‍या रुटकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

तारळे विभागात शेकडो लहान-मोठी गावे वाड्या वस्त्या डोंगर दर्‍यात वसली आहेत. अतिवृष्टीचा परिसर म्हणून तारळे विभाग ओळखला जातो. त्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय व त्याला पशुपालनाची शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली जाते. डोंगरी विभागात अतिवृष्टीत इतर पीक तग धरत नसल्याने भात ,नाचणी ही मुख्य पीक घेतले जाते. डोंगर पायथा भागात सर्व खरीप व रब्बीची पीके घेतली जातात. विभागातील अनेक लोक मुंबईच्या विविध उपनगरांत नोकरी,व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत.या चाकरमान्यांची वर्षभर यात्रा ,लग्न,उन्हाळी सुट्या यासह अनेक कारणांसाठी गावाकडे राबता असतो.तसेच यातील बहुतांशी हा शेतकरी वर्ग असल्याने शेतीच्या हंगामी कामासाठी गावाशी संपर्क असतो. पूर्वी मुंबईला जाण्यासाठी सकाळी व रात्री दोन्ही वेळेला एस.टी होत्या.पण काही वर्षांपूर्वी उत्पन्नाचे कारण पुढे करुन रात्री जाणारी गाडी बंद केली.त्यानंतर सातारा व कराड डेपोकडूनही गाड्या चालू केल्या. पण त्यातही उत्पन्नाची माशी शिंकली व रात्री जाणारी एस टी बंद झाली.

त्यानंतर परळ मुंबई डेपोने सकाळी दहाच्या दरम्यान तारळेतून सुटणारी जळव - मुंबई एस टी चालू केली आहे. त्यामुळे गेल्या आठ-दहा वर्षांपासून ती गाडी चांगली चालली आहे.गत चारपाच वर्षांत मुंबईकडे जाणार्‍या चाकरमान्यांची संख्या कमालीची वाढली आहे.तसेच रस्त्याचे विस्तीर्ण जाळे पसरल्याने कमी वेळात मुंबई गाठू लागली.त्याचा बारकाईने अभ्यास करुन पाच सहा खासगी बसेस तारळ्यातून भरुन मुंबईकडे रवाना होऊ लागल्या.पण इतक्या वर्षात अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे एस टी मात्र कुठेही दिसत नाही. यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल लपले असण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षापासून पावसाच्या लहरीपणामूळे शेतीचा व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे .त्यामुळे विभागातील हजारो लोक,युवकांची पावले मुंबईकडे वळली आहेत.त्यामीळे यात्रा ,लग्न,सुट्या व इतर कारणासाठी वर्षभर चाकरमान्यांची वर्दळ सुरु असते.याचाच फायदा घेत अनेक खाजगी बसेस अगदी पावसाळ्यात सुद्धा तारळे मुंबई दरम्यान सुरु असतात.

No comments

Powered by Blogger.