सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक


सोलापूर : इतिहासात कोणत्या समाजाची एवढी फसवणूक झाली नसेल इतकी मोठी फसवणूक फडणवीस सरकारकडून धनगर समाजाची झाल्याने समाजापुढे आंदोलनाशिवाय पर्याय नाही. येत्या 22 मे रोजी मंत्रालयावर मोर्चा काढून अकरा हजारजण ढोलगर्जनेने सरकारला जागे करणार असल्याची माहिती माजी आमदार तथा धनगर समाज उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण राज्यातून जवळपास 11 हजारजण ढोलगर्जना करणार आहेत. यासाठी सर्व राज्यांतून प्रकाश शेंडगे दौरा करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून ते सोलापूर दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आंदोलनाची विस्तृत माहिती दिली.
प्रकाश शेंडगे म्हणाले, 1956 साली कालेलकर कमिशनने सर्व्हेक्षण करुन धनगर समाज हा अतिशय मागासलेपण असल्याचे सांगून एसटीचे सवलती देण्याची शिफारस केली. तत्कालीन घटना आयोगाने केंद्राकडे शिफारस केली. मात्र, यादी प्रसिद्ध करीत असताना धनगर, धनगड असा घोळ झाला. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असल्याचे असंख्य पुरावे विधानसभा, विधानपरषिदेत दिले. पण याची फारशी कोणी दखल घेतली नाही.
2014 च्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढून बारामतीत आंदोलन केले, नऊ दिवस उपोषण केले. त्यावेळी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सत्तेवर आल्यावर लगेच पहिल्या कॅबिनेटमध्ये समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले. मात्र भाजप सत्तेवर येऊन सव्वा दोनशे कॅबिनेट बैठका झाल्या; मात्र एकदाही ‘ध’ चा उच्चार केला नसल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगत फडणवीस सरकारने समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

1956 पासून सर्व राजकीय पक्षांनी समाजाचा नुसता वापर करुन घेतला आहे. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे. आतापर्यंत 1356 ढोलगर्जनाचा विक्रम होता. मात्र आता 22 मे ला अकरा हजारजण ढोलगर्जना करून समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडणार असून तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे शेंडगे यांनी सांगितले.

या मोर्चात समाजाचे सत्तेतील, विरोधकातील सर्व नेते सामील होणार असल्याचे सांगत देव-देवतांचा उद्घोष करीत हे आमचे पारंपरिक ढोलगर्जनाचे आंदोलन केले जाणार आहे. यात सर्व स्तरांतील व्यक्तींसह समाजाचे मठाधिपतीही सामील होणार आहेत. समाजाला न्याय मिळाला नाही तर येत्या निवडणुकीत सरकारला सत्तेवरुन खाली खेचणार असल्याचा इशाराही शेंडगे यांनी दिला.

यावेळी रेणुकाताई शेंडगे, विलास पाटील, डॉ. अभिमन्यू टकले, मिनिषा वाघमोडे, राधाकृष्ण पाटील मनिषा माने, सूरज देवकते, अशोक ढोणे, शेखर बंगाळे, डी.डी. पांढरे, बाळासाहेब बंडगर यांची उपस्थिती होती.

फसवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यासाठी 2013 मध्ये पहिले आंदोलन केले. त्यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला. सर्वांनी पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी नाव देण्याचे जाहीर केले. मात्र नंतर यावर समिती नेमून विषय प्रलंबित ठेवण्याचे काम होत आहे, तर दुसरीकडे त्यांचेच नेते तावडे तेढ निर्माण होण्याची भाषा करतात. यातून समाजाची फसवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम चालू असल्याचे शेंडगे यांनी आरोप केला.

भुजबळ परत राष्ट्रवादीत होणार सक्रिय

छगन भुजबळ हे बहुजनाचे नेते आहेत. दोन वर्षे जेलमध्ये गेले म्हणून काही फरक पडत नाही. चळवळीतील नेत्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारीच ठेवूनच कार्य सुरू केलेले असते. ते लवकरच राष्ट्रवादी पक्षात सक्रिय होतील, याबाबत कोणी शंका घेऊ नये, असे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.