सट्टा लावणार्‍या पाच जणांवर कारवाई


कराड : आयपीएलमधील क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावणार्‍या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 92,605 रुपये रोख, आठ मोबाईल हँडसेट असा सुमारे 2 लाख 1 हजार 107 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 14) कराड शहरातील रविवार पेठेत कोष्टी गल्ली येथे सातारा स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. संदीप शशिकांत पवार (वय 33, रा. रविवार पेठ, कराड), अमोल शंकर दावणे (वय 29, रा. बाराडबरी झोपडपट्टी, कराड), विजय विलास चव्हाण (वय 35, सोमवार पेठ, कराड), अमोल जयवंतराव पवार (वय 35, रविवार पेठ, कराड), विजय विष्णू वायदंडे (वय 35, रा. बुधवार पेठ, कराड) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महिन्यापासून संपूर्ण देशभर आयपीएलचे सामने खेळले जात आहेत. त्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात आहे. कराड शहरातही आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लाऊन जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून कराड शहरात सट्टा लावला जातोय किंवा नाही याची खात्री करून घेतली. त्यानंतर या पथकाला यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सपोनि विकास जाधव व पथकाने गोपनिय माहिती काढून सोमवारी शहरातील रविवार पेठेत कोष्टी गल्लीमध्ये एका घराच्या आडोशाला सट्टा खेळणार्‍यांवर छापा टाकला. त्यामध्ये संदीप पवार याने आयपीएल 2018 क्रिकेट सामन्यातील संघावर 1 हजार रुपयांस 1 हजार रुपये अशा प्रकारे विजयी होणार्‍या क्रिकेट संघावर पैज म्हणून रक्‍कम स्विकारून जुगार चालवताना व तेथे जुगार खेळताना व खेळण्यासाठी हजर असलेले अमोल दावणे, विजय चव्हाण, अमोल पवार, विजय वायदंडे यांच्यावर कारवाई केली.

त्यांच्याकडून 92,605 रुपये रोख व 1,08,502 रुपयांचे आठ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 2,01,107 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, सुरेंद्र पानसांडे, उत्तम दबडे, मुबीन मुलाणी, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, मारुती लाटणे, निलेश काटकर, मयूर देशमुख, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.

No comments

Powered by Blogger.