ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन


सातारा : पद्मश्री यमुनाबाई वाईकर(वय १०२) यांचे मंगळवारी निधन झाले आहे. वाईच्या खासगी रुग्णायलात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.यमुनाबाई वाईकर यांचा जन्म ३१ डिसेंबर १९१५ साली झाला होता. त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी गायिका म्‍हणून प्रसिध्द होत्या. त्यांना लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखले जाते. यमुना विक्रम जावळे असे त्यांचे पूर्ण नाव आहे. त्या रहात असलेली वाईची ही कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे एक लोककलेचे माहेरच आहे. यमुना, तारा, हिरा या तीन बहिणी तर आईचे नाव गीताबाई असून त्याही गायनाचे काम करत होत्या. यमुनाबाई दहा वर्षाच्या असतानाच आपल्या दोन लहान बहिणींना घेऊन गावोगाव तमाशाच्या फडाबरोबर हिंडू लागल्या. रंगू-गंगू सातारकर यांच्याकडे त्यांना तमाशातले गाणे आणि अभिनयाची आदाकारी याचे धडे मिळत राहिले.

पुणे, मुंबई, नाशिक, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, नागपूर ते थेट बेळगाव आणि कोकण असा सारा महाराष्ट्र यमुनाबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालथा घातला आहे. त्यांच्या या तमाशाफडात दडलेले नाट्य आणि संगीत गावोगावच्या रसिकांना अनुभवायला मिळाले आहे. कासू-वारू आणि यमुना-हिरा-तारा-वाईकर असे एकेकाळचे गाजलेले फड होते.

अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी ‘भावबंधन’, ’मानापमान’ आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची ‘संशय कल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंदीस उतरली होती. त्यांनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. ’महाराची पोर’ नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.

गावागावांतून पोटासाठी कलाप्रदर्शन करणाऱ्या आपल्या कोल्हाटी समाजाला स्थैर्य यायला हवे याची जाणीव यमुनाबाईंना सतत सतावत राहिली. वाईच्या मध्यभागातली आणि कृष्णातीरावरची पाले उठली पाहिजेत, आपल्या समाजबांधवांना भिंतींचे घर हवे असे विचार मनात येत राहिले. यमुनाबाई वाईकरांनी समाजासाठी हौसिंग सोसायटी निर्माण केली. पोटासाठी भीक मागणाऱ्या आणि रस्तो-रस्ती-गल्ली-बोळांत गाण्यांची तान मारत हिंडत राहिलेल्या आपल्या भगिनींना यमुनाबाईंनी घरे दिली.

No comments

Powered by Blogger.