वडगाव येथे महसूल प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी येत नसल्याने पुतळ्याचे जोडे मारत पुतळ्याचे दहन


पुसेसावळी : खटाव तालुक्यातील जयराम स्वामींचे वडगाव येथे गेल्या आठ महिन्यांपासून गाव कामगार तलाठी हजर राहत नसल्याने बुधवारी सातारा-विटा राज्य मार्गावर सकाळी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. तब्बल 2 तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महसूल प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी येत नसल्याने प्रतीकात्मक पुतळ्याचे जोडे मारत पुतळ्याचे दहन करण्यात आले. अखेर पोलिसांनी महसूल यंत्रणेशी संपर्क साधल्यानंतर निवडणूक नायब तहसीलदार सुर्यकांत कापडे आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी कायमस्वरूपी तलाठी देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तलाठी गावात नसल्याने वारस नोंदी व इतर शासकीय कामांसाठी लागणारे नोंदी व दाखले मिळत नाहीत.त्यामुळे अनेक व्यवहार व शासकीय कामे ग्रामस्थांना करता येत नाहीत. याबाबत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे वारंवार मागणी करूनही याबाबत कोणतीही कारवाई होत नाही.आंदोलनाचा इशारा देवूनही महसूल प्रशासनाचे अधिकारी चर्चेसाठी आले नाही. त्यामुळे बुधवारी ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी सरपंच संतोष घार्गे, लक्ष्मण घार्गे, एम.आर.घार्गे, हणमंत भोसले, विकास घार्गे, नंदकुमार देशमुख, सिकंदर शिकलगार, दादा माळी, पांडूरंग घार्गे, शामराव कोकाटे, हुसेन शिकलगार, नजीर मुलाणी, शिवाजी घार्गे, बंडू निकम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तब्बल 2 तास झाल्यानंतरही महसूल प्रशासनाचा कोणताच अधिकारी चर्चेसाठी न आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. यावेळी महसूल प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. महसुल विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. देशासाठी रक्त सांडले, तलाठी मिळण्यासाठी आत्मदहन करु. हुतात्म्यांच्या वारसांची महसुल विभागाने चेष्ठा सुरु केल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.वाळू पकडण्यासाठी रात्रंदिवस वेळ असतो. दहा मिनिटात त्याठिकाणी पोहोचतात. मग,आंदोलनस्थळी पोहोचण्यास विलंब का? असा प्रश्‍न उपस्थित आंदोलकांनी अधिकार्‍यांपुढे उपस्थित केला. हा प्रश्‍न कायमस्वरुपी न सुटल्यास 9 सप्टेंबर हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास अधिकारी व पदाधिकार्‍यांना गावबंदी करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला.

अखेर पोलिसांनी महसूल प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर महसूल प्रशासनातील अधिकारी आंदोलनस्थळी आले. सध्या 31 मे पर्यंत तात्पुरता अन्य तलाठ्याकडे चार्ज दिला जाणार आहे. 1 जूनपासून कायमस्वरुपी तलाठी दिला जाईल. पुर्वीच्या महिला तलाठ्याची बदली करण्याचे लेखी पत्र भर उन्हात आंदोलकांनी रस्त्यावर बसूनच लिहून घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी औंध व पुसेसावळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments

Powered by Blogger.