शेतमालाला रास्त दर नसल्याने शेतकरी चिंतेत


फलटण : 
नीरा-देवघर व धोम-बलकवडी प्रकल्पाद्वारे कृष्णेचे पाणी फलटण तालुक्यात पोहोचल्याने तालुक्याचा जिरायती पट्टाही आता बागायती झाला आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढले आहे. मात्र, कोणत्याच शेतमालाला रास्त दर नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनेक वर्षे दुष्काळ सोसलेल्या फलटणची आता प्रगती होत आहे. मात्र, तालुक्यात शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग व दर नसल्याने तालुक्यात फक्‍त उसाचा पट्टाच वाढत चालला आहे. त्यातही वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. श्रीराम व न्यू फलटण शुगर वर्क्स या दोन साखर कारखान्यापलीकडे औद्योगिक विकासात आघाडी न घेतलेला फलटण तालुका आता त्या क्षेत्रातही प्रगतीच्या दिशेने झेपावताना दिसतो आहे. पूर्वीच्या श्रीराम व न्यू फलटण शुगरच्या जोडीला नव्याने उपळवे व कापशी येथे नवीन दोन साखर कारखाने, अर्कशाळा उभ्या राहिल्या. त्याचबरोबर कमिन्स हा अंतरराष्ट्रीय प्रकल्प येथे उभा राहिल्याने तालुक्यात औद्योगिक क्षेत्रातही प्रगती सुरु आहे. मात्र, ऊसाशिवाय अन्य शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग येथे उभे राहिल्याशिवाय शेती व शेतकर्‍यांना चांगले दिवस येणार नाहीत.

तालुक्यात ऊसाखालील क्षेत्रातही भरीव वाढ होत असून यावर्षीचे उसाचे क्षेत्र 16 हजार हेक्टर निर्धारित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सुमारे 17 हजार 573 हेक्टरवर खोडव्यासह उसाचे क्षेत्र उभे आहे. त्यापैकी 3 हजार 805 हेक्टरवर अडसाली, 5280 हेक्टरवर पूर्वहंगामी 3120 हेक्टरवर सुरु ऊसाच्या लागणी झाल्या असून 5 हजार 368 हेक्टरवर खोडव्याचे क्षेत्र आहे. एकूण 17573 हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा असून सन 2018-19 च्या हंगामात या संपूर्ण ऊसाचे गाळप करताना तालुक्यातील 4 ही कारखान्यांना आपला हंगाम मे अखेर चालवावा लागेल यात शंका नाही.

तालुक्यात उन्हाळी भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र 400 हेक्टर आहे. मात्र प्रत्यक्षात 460 हेक्टरवर भुईमुगाचे पीक उभे आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र प्रामुख्याने विडणी, हनुमंतवाडी, होळ, पाडेगाव आणि अलिकडे गिरवी, निरगुडी, धुमाळवाडी वगैरे क्षेत्रातही भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. तालुक्याचे 85 हेक्टर भाजीपाल्याचे क्षेत्र असताना आज प्रत्यक्षात 283 हेक्टरवर भाजीपाल्याची पीके उभी आहेत. टॉमेटो, दोडका, दुधी भोपळा यासारखी पिकेही समाधानकारक स्थितीत आहेत.

वाढत्या दुग्ध व्यवसायामुळे चारापीकाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. चारा पीकासाठी घेण्यात आलेल्या मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र 300 हेक्टर असताना प्रत्यक्षात 717 हेक्टरवर मक्याचे पीक उभे आहे तर 125 हेक्टर कडवळाचे सर्वसाधारण क्षेत्र असताना प्रत्यक्षात 507 हेक्टरवर कडवळाचे पीक उभे आहे. तालुक्यात पाण्याची स्थिती समाधानकारक असल्याने पीकाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याने केवळ उसाचे क्षेत्र सतत वाढत चालले आहे. गतवर्षीच्या हंगामात सुमारे 525 कोटी रुपयांच्या 20 लाख मे.टन ऊसाचे गाळप तालुक्यात होवूनही शेतकर्‍यांना आतापर्यंत निम्मेच पैसे मिळाले आहेत.

उर्वरित पैसे मिळावे यासाठी शेतकरी आंदोलने, मोर्चे, निवेदने यामार्गाचा अवलंब करत आहे. शासनस्तरावर त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावल्याचे दिसते. ऊसाशिवाय अन्य पिके फारशी समाधानकारक पैसा देत नसल्याने ऊसाखालील क्षेत्रात वाढ होताना दिसते आहे.

No comments

Powered by Blogger.