आ. देशमुख यांना श्रीमंत मालोजीराजे पुरस्कार


फलटण : आ. गणपतराव देशमुख व फलटणच्या राजघराण्याने पाण्यासाठी केलेले प्रयत्न पाहता या सर्वांची एकच नाळ आहे. आ. देशमुख हे पश्‍चिम महाराष्ट्रातील जागरुक व अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी विरोधी पक्षात राहून सत्तेला टक्कर देत प्रामाणिक विचारधारेद्वारे जनतेची कामे केली असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले. श्रीमंत मालोजीराजे पुरस्कार वितरण समारंभात ना. रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. त्यांच्या हस्ते आ. देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादाराजे खर्डेकर होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जि.प सदस्या सौ. शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, माजी आमदार दिपक साळुंखे, मानाप्पा यमगर, दिगंबर शिंगाडे, श्रीमंत मालोजीराजे बँकेचे चेअरमन यशवंतदादा रणवरे, व्हाईस चेअरमन सुरेश गांधी व संचालक, महानंदचे उपाध्यक्ष डी.के. पवार, पंचायत समिती सभापती सौ. रेश्मा भोसले, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

ना. रामराजे पुढे म्हणाले, सर विश्‍वेश्‍वरैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजीराजे साहेबांनी धरणांची निर्मिती केली. त्यातून आलेल्या नीरा उजवा कालव्यामुळे या भागात बागायती शेती व ऊसाचे उत्पादन वाढले. सहकारी साखर कारखाने उभे राहिल्याने पश्‍चिम महाराष्ट्राची प्रगती झाली. आ. देशमुख तथा आबासाहेब यांच्या कृतीस साजेसा आणि त्याचा बहुमान करणारा असा हा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. श्रीमंत मालोजीराजे आणि आ. गणपतराव देशमुख ही पाण्याची ओढ असणारी आणि त्यातून आपला भाग विकासामुख ठेवण्याची भूमिका असणारी कर्तृत्ववान माणसे आहेत. सभागृहात आपल्या भागाची अभ्यासपूर्ण मांडणी आणि त्यामधील सातत्य यामुळेच सांगोल्याला कृष्णेचे पाणी पोहोचले. आ. गणपतराव देशमुख हे विकास पुरुष आहेत. पाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये त्यांनी घेतलेली मेहनत केलेले प्रयत्न नव्या पिढीने समजावून घेतले पाहिजेत.

सत्काराला उत्तर देताना आ. गणपतराव देशमुख म्हणाले, हा पुरस्कार गेली 55 वर्षे आपल्यावर प्रेम केलेेल्या सर्वसामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या कार्याचा गौरव करताना वयाच्या 21 व्या वर्षी या राजाने राज्यात स्त्रियांना त्याचप्रमाणे अस्पृष्यांना समान हक्क राहतील, असे जाहीर करुन अस्पृश्यांना पाणवठे खुले केले. तसेच दरबारातही त्यांना खुलेपणाने वावरता येईल, याची ग्वाही दिली.

संस्थान विलीनीकरण प्रसंगी खजिन्यासहीत विलीनीकरणास मान्यता दिली. शैक्षणिक सुधारणा अंमलात आणल्या. केंद्राचे सहाय्य न घेता राज्याच्या हिंमतीवर तत्कालीन बांधकाम मंत्री या नात्याने कोयना धरणाचे काम सुरु केले.यावेळी आ. दीपक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.संजीवराजे यांनी प्रास्तविक केले. प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.