पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटात मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरू


कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसला नेहमीच टोकाच्या मतभेदांनी ग्रासले आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातील मनोमिलनाची जोरदार चर्चा कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, या मनोमिलनाबाबत आपणास काहीच माहिती नाही, असे सांगत मनोमिलनाच्या चर्चा केवळ अफवाच असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले.कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी सलग ३५ वर्ष प्रतिनिधीत्व केल्यानंतर कॉंग्रेसने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत जवळपास १६ हजार मतांनी चव्हाण यांनी अपक्ष उमेदवार तत्कालीन कॉंग्रेस आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचा पराभव केला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपचे चिटणीस, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना रोखण्यासाठी उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गटाने एकत्र यावे, अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

यापूर्वीच कोणत्याही स्थितीत आपण कराड दक्षिणमधूनच विधानसभा निवडणूक लढवणार, असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी विलासराव पाटील उंडाळकर यांनी कराड दक्षिणचा आमदार हा रयत संघटनेचाच असेल, असे जाहीर केले. त्यामुळे कॉंग्रेसतंर्गत दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन गटाचे मनोमिलन होणार का? याबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु, या चर्चेला कोणताही अर्थ नसल्याचे संकेत देत "मनोमिलन, कसले मनोमिलन, मला तर काहीच माहिती नाही' असे सांगत आमदार चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

No comments

Powered by Blogger.