महाराजांच्या भांडणात पवारांचीच कॉलर ताठ


सातारा : चार वर्षांत कुणी कितीही आडवा -तिडवा, ‘डांगडिंग डिंगा’ केला तरी पक्षाचे मसिहा असलेल्या शरद पवार यांनी कधीच चुचकारले सुद्धा नाही. एका गटाने तक्रार केली तर या कानाने ऐकायचे, गालातल्या गालात हसायचे आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचे. दुसर्‍या गटाने तक्रार केली की त्या कानाने ऐकायचे या कानाने सोडून द्यायचे आणि पुन्हा आपले काम सुरुच ठेवायचे, अशी पवार नीती आजवर सातारा जिल्हा पहात आला आहे. लोकसभेची निवडणूक जवळ आली की पवार मात्र ऐन भरात येतात, अंगात आल्यासारखे त्यांना भरामते आणि ते घुमूही लागतात. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पवारांनी घोड्यावर अशी मांड टाकली की लगाम आपल्या हातात ठेवून मी इथला ‘सबसे बडा खिलाडी’असल्याचे 9 मेच्या पत्रकार परिषदेद्वारे दर्शन त्यांनी दिले.

सातारा जिल्हा पूर्वांपार शरद पवारांच्या विचारांने चालणारा. पवार म्हणतील ती पूर्व दिशा, असा इथला समज. अजित पवार सातार्‍याचे पालकमंत्री झाल्यानंतर थोरले पवार, धाकटे पवार अशी सातारा जिल्ह्यात गटातटातली विभागणी झाली. तरीही सातारा जिल्ह्याचे अंतिम निर्णय शरद पवारांकडेच राहिले. छत्रपती उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग 9 वर्षे खासदार आहे. तर सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्याकडे आहेत. रामराजे ना. निंबाळकर व उदयनराजे भोसले यांच्यामधील कलगीतुरा महाराष्ट्राने पाहिला. दोघांनीही एकमेकांची यथेच्छ ‘तोंड पूजा’ केली. महाराज लोकांनी तोंडाला कुलूप लावावे यासाठी शरद पवारांच्या दिल्‍ली येथील निवासस्थानी समेटाची बैठकही झाली. मात्र, ‘मुक्या’च्या पलिकडे ही बैठक काही पुढे गेली नाही. पवारांना वाटले जादूच्या झप्पीत माझ्या पक्षातल्या पेल्यातले वादळ विरघळून गेले. मात्र, तसे काही घडलेच नाही.

सातारकर व फलटणकर ही तशी दोन्ही बडी शक्‍तीस्थाने. दिल्‍लीत मिटलेलं समेटाचं ‘गठूळं’ लोणंदच्या एमआयडीसीत कधी फिटलं हे पवारांनाही कळलं नाही आणि पुन्हा या दोघांनी एकमेकांविरोधात माती उकरायला सुरुवात केली. एकजण पत्रकबाजीतून गुरगुरायचा तर दुसरा जाहीर सभांमधून तोंड पट्टा चालवायचा. एकाने खोडी काढली की दुसरा आणखी जास्त खोडीलपणा करायचा. कॉलर उडवायची स्टाईल तर खास उदयनराजेंची. एखाद्याशी पंगा घ्यायचा म्हटलं की उदयनराजे कॉलर उडवून इशारा देणारच, हजारोंच्या गर्दीत उदयनराजेंनी कॉलर उडवली की टाळ्या आणि शिट्ट्या यांचा पाऊस पडणारच. मात्र, अजिंक्यतारा साखर कारखान्यावर शरद पवारांच्या साक्षीने झालेल्या सभेत रामराजे ना. निंबाळकर यांनीही उदयनराजेंसारखीच कॉलर उडवून दाखवली. एक कॉलर वर करतो तर दुसरा विजार, असे ऐतिहासिक विधान रामराजेंनी त्यावेळी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार गुपचूपपणे कॉलरला हात लावून आपल्याला पण जमतंय का ते बघायचे. यात एवढं फाटलं की शरद पवारांनी दाबण घेवून शिवायचा प्रयत्न केला तरी ते शिवलं जाणार नव्हतं.

पवारांच्या बालेकिल्ल्यात फाटत चाललेल्या या तंबूत आणखी ठिणगी पडली ती सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत. सातार्‍याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचा झालेला पराभव शिवेंद्रराजेंच्या एवढा जिव्हारी लागला की फलटण-सातार्‍यामध्ये जुंपलेलं युद्ध सातार्‍याच्या राजघराण्यात येवून भिडलं ते सुरुचि व जलमंदिरच्या दारापर्यंत येवून थडकलं आणि त्याचा ठो असा आवाज झाला. आनेवाडी टोलनाका कुणी घ्यायचा यावरुन उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यामध्ये जी चकमक झाली त्यात सातार्‍याची पुरती बेअदबी झाली. रामराजे व उदयनराजे यांच्या मध्ये केवळ शाब्दीक संघर्ष राहिला. मात्र, उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यातील संघर्ष गोळीबारापर्यंत जीवघेणा ठरु लागला. मात्र, गेल्या चार वर्षांच्या या घडामोडीत शरद पवारांनी फक्‍त परिस्थितीवर लक्ष ठेवायचीच भूमिका घेतली.

 पुण्यातून सातारपर्यंत उदयनराजेंना गाडीत घ्यायचे, सातार्‍यातून कराडपर्यंत पुन्हा शिवेंद्रराजेंना गाडीत घ्यायचे आणि कराडातून सातारपर्यंत येताना रामराजेंशी चर्चा करायची, अशी चाणक्यनीती शरद पवार कायम खेळत राहिले. चार वर्षांत ना त्यांनी कुणाचे कान टोचले ना कुणाला समज दिली. दोन्ही गट समान अंतरावर ठेवून पवारांनी घारीसारखे वरुन लक्ष ठेवले. खाजगी बैठकांमध्ये चिमटे काढायचे आणि वेळ मारुन न्यायची पद्धत त्यांनी आजवर अवलंबली. उदयनराजेंनाही वाटणार शरद पवारांचा आपण स्वत:च्या हाताने डोक्यावर ठेवलेला हात अजूनही तसाच आहे आणि रामराजेंनाही वाटावे पवार साहेबांची आपल्यावरची कृपादृष्टी तशीच आहे. सातारा जिल्ह्याच्या पोलिटिकल ड्राम्याचा खरा क्‍लायमॅक्स दिसला तो उदयनराजेंच्या वाढदिवसा दिवशी.

 रामराजेंसह पक्षातील झाडून सगळे आमदार जिल्हा परिषदेच्या मैदानावर गैरहजर राहिले. मात्र, एकीकडे आमदारांना चला म्हणण्याचे आदेश पवारांनी काढले नाहीत. तेव्हाच दुसरीकडे ते स्वत: मात्र उदयनराजेंचा केक कापायला जिल्हा परिषदेच्या मैदानावर गेले. त्यावेळीही पवारांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. गेल्या चार वर्षांचा हा राष्ट्रवादी पक्षातील खैंदुळ पाहता ‘तुमचे तुम्ही गोंदूण घ्या’ अशी पवारांची दिशा राहिली आहे. आता लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना पवारांनी हा विस्कटलेला सारीपाट स्वत:च मांडायला घेतला आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांची देहबोली ‘सबसे बडा खिलाडी’ असल्यासारखीच दिसली. उदयनराजे व राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये पेच आहे, तो कसा सोडवणार? त्यावर उतारा काय? असे थेट प्रश्‍न पवारांना विचारल्यानंतर ते अजिबात विचलीत झाले नाहीत. कसा पेच? मी आलो की सगळं एका दोरीत सरळ होतं, असे म्हणत आपली मांड घट्ट असल्याचे त्यांनी उक्‍तीतून दर्शवले. निवडणुका आल्या की सगळ्यांची वर गेलेली कॉलर अशी खाली येते असे जाहीर विधान पवारांनी केले ते केवळ उदयनराजेंनाच लागू नाही. ते सगळ्यांनाच लागू आहे. हे विधान करताना पवारांनी स्वत:ही कॉलर उडवली आणि महाराज मंडळींपेक्षा माझीच कॉलर ताठ असल्याचे दर्शन घडवले. यापूर्वी या विषयावर कधीही जाहीरपणे न बोलणारे शरद पवार योग्य टायमिंग साधून कृतीतून बोलते झाले. आमदारही सरळ येतील, असेही पवार म्हणाले. त्यातून सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपलीच कमांड असल्याची प्रचिती त्यांनी दिली.
उदयनराजे असो, रामराजे असो अथवा अन्य कुणी तुम्हीच कॉलर उडवायचे कारण नाही. मीही कॉलर उडवू शकतो आणि तुमची कॉलर खाली घेवू शकतो, असेच पवारांना दाखवायचे होते. फक्‍त ते वेळेच्या प्रतीक्षेत होते. पवारांची ही खेळी तसा उदयनराजेंसाठी अलर्ट कॉल आहे तसाच राष्ट्रवादीतील आमदारांसाठी पुढचं सगळं माझ्या हातात आहे, अशी सांगणारी धोक्याची घंटाही आहे. त्यामुळे जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येतील तसतशी शरद पवार कुणाच्या कॉलरला धरून लोकसभेच्या मांडवाखाली आणणार आणि पवारांच्या त्या कृतीनंतर मग कोण कुणाची कॉलर फाडणार ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे.No comments

Powered by Blogger.