Your Own Digital Platform

कोयनेतून चालूवर्षी 3207 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती


पाटण : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चार टप्प्यांतून चालूवर्षी एकूण तब्बल 3207.214 दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. यासाठी सिंचनासह एकूण 99.74 टीएमसी इतका पाणीवापर झाला आहे. मध्यंतरीपर्यंत याच प्रकल्पातून कमी झालेली वीजनिर्मिती व त्यामुळे शासनाचा तब्बल अब्जावधींचा पाण्यात गेलेला महसूल भरून काढण्यात वीज कंपनीला यशमिळाले आहे. याशिवाय तुलनात्मक कमीत कमी भारनियमन करून अखंडित व सुरळीत वीज दिल्याने सामान्यांसह उद्योग जगतालाही याचा भरीव फायदा झाला आहे. 

पोफळी, अलोरे, कोयना चौथा टप्पा व कोयना धरण पायथा वीजगृह अशा चार जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाते. या चारही टप्यांची एकूण वीजनिर्मितीची क्षमता ही 1920 मेगावॉट इतकी आहे. यात पश्‍चिमेकडील तीन टप्यांची क्षमता 1880 मेगावॉट इतकी आहे. यात कोयना धरणाच्या पायथ्याशी वीस मेगावॉट क्षमतेची दोन जनित्रे कार्यरत असून येथून चाळीस मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येते.

येथे पावसाळ्यात ज्यावेळी धरणातील पाणीसाठा नियंत्रित केला जातो, त्यावेळी व वर्षभर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणार्‍या पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. 1 जून ते 31 मे या कालावधीत येथून पावसाळ्यात महापूर काळात 2.28 तर तांत्रिक वर्षात सिंचनासाठी 29.70 अशा एकूण 32.18 टीएमसी पाण्यावर 144.450 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. पश्‍चिमेकडील प्रकल्पांच्या तुलनेत येथे पाण्याचा दाब कमी असल्याने सरासरी त्या पटीत दहा ते पंधरा टक्के वीजनिर्मिती होते.

पश्‍चिमेकडील पोफळी, अलोरे, कोयना चौथा टप्पा या तीन प्रकल्पांसाठी यावेळी पाणीवाटप लवादाच्या आरक्षित कोठ्यानूसार 67.56 टीएमसी पाणीवापर झाला. यातून एकूण 3062.764 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली. त्यामुळे चालू तांत्रिक वर्षपुर्तीला या चारही टप्प्यांतून एकूण 3207.214 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली होती. गतवर्षी हीच वीजनिर्मिती 3288.422 दशलक्ष युनिट इतकी करण्यात आली होती.

चालूवर्षी अगदी शेवटच्या दोन महिन्यांपूर्वीपर्यंत या कोयना जलविद्युत प्रकल्पातून फार कमी प्रमाणात वीजनिर्मिती झाली होती. यामुळे एका बाजूला यातून शासनाला मिळणारा अब्जावधींचा महसूल पाण्यात गेला होताच. शिवाय पाण्याचा योग्य वेळेत सकारात्मक वापर न झाल्यास नव्या तांत्रिक वर्षात धरणात जास्त पाणी शिल्लक राहिले असते. त्यामुळे पावसाळ्यात लवकर धरण भरल्याने मग पाणीसाठा नियोजनासाठी धरणातून लवकर विनावापर पाणी पूर्वेकडे सोडावे लागल्याने त्या विभागात पुन्हा महापूर आणि त्यामुळे अन्य नुकसान असा दुहेरी फटका बसला असता.

मात्र काही दिवसांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा तुटवडा जाणवला याशिवाय महत्वपूर्ण वीजनिर्मिती प्रकल्प दुरूस्ती व देखभाल यासाठी बंद ठेवण्यात आले आहे. स्वाभाविकच मग यातून कोयना प्रकल्पातून जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे आता यातील सर्वच बाबींना न्याय मिळाला. याशिवाय कमी वीजनिर्मितीमुळे राज्याचा अब्जावधींचा महसूल ही यातून भरून निघाला हीदेखील समाधानकारक बाब आहे. या एक जूनपासून सुरू झालेल्या नवीन तांत्रिक वर्षारंभाला येथे तब्बल 29 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर येणार्‍या पावसापर्यंत सिंचनाची व विजेची गरज सहजपणे भागविण्यात येथे प्रशासन व धरण व्यवस्थापनाला निश्‍चितच यश मिळेल यात शंकाच नाही.