Your Own Digital Platform

घरोघरी बसतोय मिरचीचा ठसका, खिशाला महागाईची फोडणी


सातारा : मान्सूनच्या आगमनास काहीच दिवस शिल्लक राहिल्याने वर्षभरासाठीचे तिखट मसाला बनवण्यासाठी महिला वर्गाची धांदल उडाली आहे. सुक्या मिरचीचे भाव वधारले तरीही मिरची कांडप यंत्रावर लाल तिखट कुटण्यासाठी महिलांच्या रांगा लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागासह ठिकठिकाणी दिसत आहे. लाल तिखटासाठी लवंगी मिरची भाव खावून जात असून लाल रंगासाठी ब्याडगीला प्राधान्य दिले जात आहे. अलिकडे रेडी टू कुक आणि रेडी टू इटचा जमाना असला तरी घरगुती मसाल्यांना प्राधान्य दिले जात आहे.सध्या अधिक महिना सुरु असून थोड्याच दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असल्याने वर्षभराची वाळवाणं व मसाल्याची बेगमी करण्यात महिला वर्ग व्यस्त आहे. घरोघरी आजही पारंपारिक पध्दतीनेच मसाल्याचे तिखट बनवले जाते. मार्च ते मे महिन्यात कडक उन्ह असल्याने काळे तिखट बनवले जात असल्याने सध्या सर्वच डंक गर्दीने गजबजलेले दिसत आहेत. मिरची व मसालाच्या खरेदीला वेग आल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या व गरम मसाल्याच्या पदार्थांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लाल मिरचीचे काळे तिखट. स्वयंपाक कोणताही असो तो तिखटाशिवाय पूर्ण होत नाही. उन्हाळ्यात कडक उन्हात लाल मिरची वाळवून त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे गरम मसाला टाकून वर्षभर पुरेल एवढे तिखट करुन ठेवले जाते. घरातील गृहिणी त्यासाठी प्रयत्नशील असते. वाढती महागाई आणि त्यातच जीएसटी यामुळे यावर्षी लाल मिरची चांगलीच झोंबत आहे. एरवी शंभर रुपये किलोने मिळणारी वाळलेली लाल मिरची सध्या 130 रुपयांपासून पुढे मिळू लागली आहे. एका चौकोनी कुटुंबासाठी साधारण पाच किलो मिरच्यांचे तिखट वर्षभरासाठी लागते. मिरचीच्या प्रमाणातच गरम मसाला वापरला जातो.

घरगुती काळा मसाला तयार करण्यासाठी महिला वर्गातून लाल व तिखट वाणाच्या सुक्या मिरच्यांना पसंती दिली जात आहे. सुक्या मिरच्यांमध्ये लवंगी, शंकेश्‍वरी, गुंटूर, काश्मिरी व ब्याडगी अशा विविध प्रकारच्या सुक्या मिरच्या उपलब्ध असून महिला वर्गातून चोखंदळपणे मिरच्या खरेदी केल्या जात आहेत.

दरम्यान, सर्वत्रच लाल तिखट बनवण्याची लगीनघाई सुरु असल्याने मिरची कांडप यंत्रावरही मिरच्या कुटण्यासाठी महिलांच्या रांगा लागत आहेत. फक्त मार्च ते मे या उन्हाळी सिझनमध्ये मिरची व मसाल्याच्या पदार्थांच्या खरेदी-विक्रीतून लाखोंची उलाढाल होत आहे.

असा तयार होतो काळा मसाला...

मिरची खरेदी हा मसाल्यातील पहिला टप्पा असून दुसर्‍या टप्प्यात या मिरच्या साफ करुन त्याचे देठ काढले जातात. मग मिरच्यांच्या वजनाच्या प्रमाणात हळकुंड, लवंग, काळी मिरी, दालचिनी, साधेजिरे, शहाजिरे, तमाल पत्री, राम पत्री, दगड फूल, बादल फूल असा गरम मसाला मिसळला जातो. गरजे प्रमाणे मसाल्याचे काही जिन्नस भाजून, तळून घेतले जातात. मग हे सर्व जिन्नस मिरचीसोबत एकत्र करुन डंकांवर कुटले जाते. तयार झालेल्या मिरची पावडरमध्ये कांदा, खोबरे, पांढरे तीळ, खसखस भाजून त्यामध्ये लसून, मीठ घालून बारीक वाटून एकजीव केले जाते, आणि खमंग काळे तिखट तयार होते.