Your Own Digital Platform

सातार्‍यात दिवसाढवळ्या फायरिंगने थरार


सातारा : सातार्‍यातील बुधवार नाका येथे गुरुवारी सायंकाळी युवकांच्या भांडणातून थेट गोळीबाराची थरारक घटना घडली. एकाचा गेम करण्याच्या प्रयत्नातून झालेल्या फायरिंगमधील बंदुकीची गोळी एका युवतीला लागून ती गंभीर जखमी झाली. तिच्या मदतीला धावणार्‍यांवरही फायरिंग झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर फायरिंग करणारा संशयित पसार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, जखमी युवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी तणावसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ऋषभ जाधव (रा. रविवार पेठ) असे फायरिंग करून पळून जाणार्‍या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत अन्य दोन संशयित आरोपी असून ते तिघे दुचाकीवरून पळून गेले आहेत. 

अश्‍विनी शेखर कांबळे (वय 24, रा. बुधवार नाका, सातारा) असे फायरिंगमध्ये गंभीर जखमी झालेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संशयित ऋषभ जाधव याचा सातार्‍यातीलच अतिक शेख या युवकाबरोबर वाद आहे. याच वादातून ऋषभ याने त्याचा गेम करण्याचा प्लॅन केला. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अतिक हा बुधवार नाका येथे मित्राबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी ऋषभ जाधव हा ट्रिपलसीट तेथून अतिक याच्याकडे पाहत निघून गेला. मात्र, पाचच मिनिटांमध्ये ऋषभ पुन्हा दोन मित्रांसोबत दुचाकीवरून तेथे आला. अतिक याला पाहून ऋषभ याने थेट बंदूक काढली.

ही बाब अतिक याने पाहिल्यानंतर तो जीवाच्या आकांताने पळू लागला. बुधवार नाका हा परिसर अरूंद असल्याने अतिक याला पळायला जागा मिळेना. हीच संधी साधत ऋषभ याने फायरिंग केले. अतिक याने ती गोळी चुकवली मात्र ती गोळी अश्‍विनी या युवतीला लागली. यावेळी अश्‍विनीकडे एक वर्षाचे लहान बाळ होते. अचानक फायरिंग झाल्याने व युवतीला गोळी लागल्याने परिसर हादरला. याचा फायदा घेवून अतिक तेथून सटकला. मात्र अश्‍विनीला गोळी लागल्याचे पाहून तिच्या कुटुंबातील निलेश यांनी घटनास्थळी धाव घेतली. निलेश यांनी संशयित आरोपीला प्रतिकार केला. आपण पकडलो जाणार या भितीने ऋषभ याने बंदुकीच्या पाठीमागील बाजूने निलेश यांना मारहाण करत बंदूक रोखली. याच गडबडीत ऋषभ याने सुमारे दोन राऊंड फायर केले असल्याचे निलेश यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सुमारे 10 मिनिटे चाललेल्या या थरारानंतर ऋषभ जाधव याला त्याच्या दोन सहकार्‍यांनी दुचाकीवर घेवून तेथून पळ काढला. जखमी अश्‍विनी कांबळे यांच्या कुटुंबियांनी धाव घेवून तत्काळ तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सातार्‍यात फायरिंग झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरल्यानंतर शाहूपुरी पोलिस, शहर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने घटनास्थळी, सिव्हीलमध्ये धाव घेतली. जखमी युवतीला प्रकृती चिंताजनक असल्यामुळे सिव्हीलमधून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यावेळी कांबळे कुटुंबिय व नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात गर्दी केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी खासगी रुग्णालयात जावून जखमी अश्‍विनी कांबळेची भेट घेतली. ‘तुम्ही काळजी करु नका. उपचारामध्ये कुठेही हयगय होणार नाही. संशयित आरोपींना लवकरच पकडू,’ असा शब्द दिला. एसपी संदीप पाटील यांनी डॉक्टरांशीही संवाद साधून अधिक माहिती घेतली. दरम्यान, एसपी संदीप पाटील रुग्णालयाबाहेर आल्यानंतर जमाव संतप्त बनला. महिलांनी तत्काळ संशयित आरोपीला अटक करण्याची मागणी केली. संशयिताला अटक करा व त्याला गोळ्या घाला, अशी मागणीही केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, बुधवार नाका येथे पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून त्याचा पंचनामा केला. यावेळी एक राऊंड सापडला असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. यातील ज्याच्यावर फायरिंग झाले त्या अतिक शेख या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संशयिताला त्वरित अटक करा : खा. उदयनराजे
सातार्‍यात फायरिंगची घटना घडल्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन जखमीच्या नातेवाईकांची भेट घेतली. तत्पूर्वी, खा. उदयनराजे भोसले यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली. जखमी युवतीच्या कुटुंबीयांनी संशयित आरोपीला अटक करावी. त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी खा. उदयनराजेंकडे केली. यावर ते म्हणाले, ‘मी आलोय आता, संशयित आरोपीला अटक झाली पाहिजे व त्याला कठोर शासन झाले पाहिजे. युवकांच्या अंतर्गत वादावर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. सर्वसामान्य सातारकरांना कोणताही त्रास होता कामा नये’ असे सांगितले. दरम्यान, आपण पुन्हा पोलिसांना भेटणार असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोळी लागल्यानंतरही अश्‍विनीने चिमुरड्याला कवटाळले 

गोळीबाराच्या घटनेवेळी युवतीसोबत चिमुरडा मुलगा वीरही होता.अश्‍विनीला गोळी लागताच तिने वीरला सुरक्षितपणे खाली सोडले. मात्र, पुन्हा फायरिंगचा प्रयत्न झाल्याने अश्‍विनीने लहान बाळाला घट्ट पकडले. या घटनेने चिमुरडा भयभीत होऊन रडू लागला. एकीकडे रक्तबंबाळ अश्‍विनी व दुसरीकडे ओक्साबोक्सी रडणारा चिमुरडा यामुळे घटनास्थळीचे वातावरण हेलावणारे होते.