Your Own Digital Platform

सातारा पालिकाच करणार ६४ झाडांची कत्तल


सातारा : 
सातारा नगरपालिकेने सातारकरांच्या घरपट्टी, पाणीपट्टीत प्रचंड वाढ केली असतानाच वृक्षकरही भरमसाट वाढवला आहे. वृक्षकर आकारला जात असताना तेवढ्या प्रमाणात उपाययोजना करताना नगरपालिका दिसत नाही. राज्य शासनाकडून 14 कोटी वृक्ष लागवड केली जात असताना सातारा नगरपालिका मात्र शहरातील पर्यावरणासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या 64 देशी वृक्षांची कत्तल करणार आहे. नगरपालिकेच्या या भूमिकेविरोधात सातारकर वृक्षप्रेमींतून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.राज्य व केंद्र शासनांच्या माध्यमातून शहरात साडेचार कोटींची झाडे लावण्यात येणार आहेत. मात्र, या वृक्षलागवडीत देशी वृक्षांना नगण्य स्थान देण्यात आले आहे. त्यातून पर्यावरणाचा समतोल किती राखला जाईल हे ज्या त्या वेळी कळेल. मात्र, टक्केवारीचा ‘तोल’ मात्र साधला गेल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

सातारा नगरपालिकेच्या वृक्ष विभागाने किती आणि कुठे कुठे वृक्षारोपण केले, हा संशोधनाचा विषय आहे. दरवर्षी मात्र या वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. या विभागाच्या बैठकाही नियमित होत नाहीत. दि. 15 रोजी बोलावलेली बैठकही ऐनवेळी तहकूब करण्यात आली. कित्येक महिन्यांनी काढण्यात आलेल्या बैठकीलाही मुहूर्त सापडला नाही. तहकूब करण्यात आलेली बैठक दि. 18 घेतली जाणार आहे. या विभागाच्या कामकाजाबाबत पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये प्रचंड उदासिनता असल्याचे यावरुन स्पष्ट होते. या समितीसमोर झाडे तोडण्याचा विषय असून तो मंजूर केला जाणार आहे. शहरातील विविध 64 झाडे तोडण्यास नगरपालिका मंजुरी देणार असल्याने शहरातील देशी वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

दरवर्षी शेकडो झाडे तोडण्यास परवानगी दिली जाते. मात्र, तेवढ्या प्रमाणात झाडे लावली जात नाहीत. वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संवर्धन करण्याकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे वृक्ष विभागाचे काम म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, असे चित्र आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेकडून तोडण्यात येणार्‍या 64 झाडांमध्ये निलगिरीची सुमारे 21 झाडे आहेत. वड 2, पिंपळ 4, सागवान 2, चिंच 2, नारळ 1, उंबर 3, कडुलिंब 1, बोर 1, गुलमोहर 6, जांभूळ 2, आंबा 1, सुरु 1 तसे इतर 6 हून अधिक झाडांची संख्या आहेत. झाडे मुळातून तोडण्याबरोबरच काही ठिकाणी फांद्या छाटण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे 64 पैकी काही झाडे तोडण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनीच दिला आहे. नगरसेवक मिलिंद काकडे तसेच नगरसेविका कुसम गायकवाड यांचा त्यामध्ये समावेश आहे. सातार्‍यातील बड्यांचीही नावे या यादीत आहेत. ज्यांनी वृक्ष संवर्धनासाठी जागृती करायची अशा जबाबदार घटकांकडून झाडे तोडण्याचे प्रस्ताव दिले जात असल्याने पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य शासनसन जुलै महिन्यात 14 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करत असताना सातारा पालिका मात्र झाडांची कत्तल करणारे विषय अजेंड्यावर घेवून त्याला मंजुरी देत आहे. ज्या ठिकाणी वृक्ष तोडण्यास परवानगी दिली गेली आहे, त्याठिकाणी सुरक्षित जागेवर संबंधितांकडून वृक्ष लागवड करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.