दुचाकी अपघातात दोन युवक जागीच ठार


औंध : औंध ते पळशी रस्त्यावर खरशिंगे नजीक सोमवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत औंध पोलिस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास खरशिंगे मार्गे रणजित पांडुरंग देशमुख (वय 28) आपल्या औंधनजीकच्या जायगाव या गावी परत निघाले होते. औंध येथील शंकर तुकाराम रणदिवे (वय 38) पळशी येथील एचपीसीएल कंपनीच्या पेट्रोल लाईन तपासणीच्या कामावर निघाले होते. दरम्यान, रणजित देशमुख व शंकर रणदिवे खरशिंगे येथील धनगर वस्तीनजीकच्या रस्त्यावर आले असता दोघांच्या दुचाकी गाडयांची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोघेही रस्त्यावर आपटल्याने दोघांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाला. दोघांचा ही जागेवरच मृत्यू झाला.

ही घटना औंध परिसरात वाऱ्यासारखी पसरताच दोघांना पाहण्यासाठी नागरिक, युवकांची अपघात स्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली. घटनेची नोंद औंध पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.

No comments

Powered by Blogger.