Your Own Digital Platform

मांढरदेवचे चार खेळाडू महाराष्ट्र संघात


मांढरदेव : मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्य मैदानी स्पर्धेमध्ये मांढरदेव येथील अ‍ॅथलेटिक्स सेंंटरच्या खेळाडूंनी उज्ज्वल यश संपादन केले असून या स्पर्धेतून 18 वर्षाखालील मुले व मुली गटातील आकांक्षा शेलार, विशाखा साळुंखे, अभिजित पाटील यांची तर भारतीय संघामध्ये सराव करणार्‍या कालिदास हिरवे याची खुल्या गटामध्ये महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने अठरा वर्षाखालील मुले मुली व खुला गटातील पुरुष व महिला यांची निवड चाचणी स्पर्धा नाशिक येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत अठरा वर्षाखालील मुले व मुली यांच्या गटात विशाखा साळुंखे हिने 1500 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक, आकांक्षा शेलारने 3000 मीटर धावणेमध्ये रौप्यपदक , अभिजित पाटीलने 2000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक, बाळू पुकळे याने 3000 मीटरमध्ये कास्यपदक, सुप्रिया मांढरे 400 मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक संपादन केले. या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, विशाखा साळुंखे आणि अभिजित पाटील या खेळाडूंची गुजरात येथे होणार्‍या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली तर भुतान येथे भारतीय संघात सराव करणार्‍या कालिदास हिरवे याची 5000 मीटर धावणे, 10000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारासाठी महाराष्ट्र संघात थेट निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक राजगुरु कोचळे आणि धोंडिराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.