पुण्यातील मोर्चाच्या तयारीसाठी फलटणला सोमवारी आक्रोश मेळावा


फलटण : राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ पुण्यातील अलका चौक ते साखर संकुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून सोमवार दि. 25 रोजी साखरवाडी ता.फलटण येथे शेतकरी बांधवांचा आक्रोश मेळावा खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिली.राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी येत्या 29 जूनला पुण्यातील साखर संकुलावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी यापूर्वीच केली आहे. याच बरोबर फलटण तालुक्यातील थकीत ऊस बिले, कृषी पंपांची थकीत बिले माफ करावीत, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 कोरा करावा, दुधाला 5 रुपये अनुदान मिळावे, शेतीमालाला दीड पट हमीभाव मिळावा, न्यू फलटण शुगर वर्क्सच्या कामगारांची देणी मिळवीत, या व शेती महामंडळामधील अनेक प्रलंबित प्रश्‍नांसाठी हा आक्रोश मेळावा आयोजित केला आहे.

राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले असून त्याच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा काढला जाणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांना साखर कारखानदारांनी अद्यापही एफआरपी दिली नाही. ती त्वरित द्यावी किँवा साखर आयुक्तांनी कारखान्याच्या मालकीची मालमत्ता जप्त करावी. तसेच दूध उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था खूप वाईट असून दुधाचे दर घसरत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

No comments

Powered by Blogger.