Your Own Digital Platform

सातार्‍यात बनावट नोटांची छपाई?


सातारा : सांगली पोलिसांनी मंगळवारी बनावट नोटाप्रकरणी एकाला मिरज येथे अटक केल्यानंतर त्या नोटा सातार्‍यातील एका युवकाने दिल्या असल्याचे कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा व सांगली पोलिसांची बुधवारी याप्रकरणी कारवाई सुरु असल्याचे खात्रीशीर वृत्त असून 2000 व 500 रुपयांच्या बनावट नोटा सातार्‍यात छापल्या जात आहेत का? नोटा छापणार्‍या टोळीमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे? आर्थिक व्यवस्था खिळखिळी करणार्‍यांनी बाजारात किती नोटा वितरीत केल्या आहेत? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी दुपारी सांगली पोलिसांनी मिरज येथून गौस गब्बार मोमीन (वय 21, रा.मिरज) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 2 हजार रुपयांच्या चार नोटा तर 500 रुपयांच्या सतरा अशा एकूण 21 बनावट नोटा सापडल्या. चलनी नोटांप्रमाणे दिसणार्‍या त्या नोटा बनावट असल्याचे समोर आल्यानंतर सांगली पोलिसांनी कारवाईचा फास आवळला. संशयित गौस मोमीन याच्याकडे प्राथमिक चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने या नोटा शुभम खामकर (रा.एमआयडीसी, सातारा) या युवकाकडून घेतल्या असल्याची कबुली दिली.

2000 व 500 रुपयांच्या सापडलेल्या बनावट नोटा सातार्‍यातील युवकाने दिल्याचे समोर आल्यानंतर सांगली पोलिसांनी आपला मोर्चा सातार्‍याकडे वळवत कारवाईचा फास आणखी आवळला. संशयित गौस व शुभम या दोघांवर बनावट नोटाप्रकरणी सांगली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. बनावट नोटाप्रकरणी सातार्‍यातील युवकाचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर सातारा पोलिस दलातही खळबळ उडाली. बुधवारी सकाळपासून शुभम खामकर या युवकाची माहिती घेवून त्याला शोधण्यासाठी ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार बनावट नोटाच्या लिंकप्रकरणी सातारा पोलिसांनी काही संशयितांची उचलबांगडी केलेली आहे. रात्री उशीरापर्यंत या कारवाईबाबत पोलिसांकडून गोपनियता बाळगण्यात आली होती. बनावट नोटाप्रकरणी महत्वाचे धागेदोर हाती लागल्यानंतर सातारा पोलिसांनी कारवाई तीव्र केली.

बनावट नोटांच्या प्रकरणामुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. यामध्ये बनावट नोटा सातार्‍यातील युवकाने दिल्याने त्या नोटा सातार्‍यात छापल्या गेल्या आहेत का? नोटा छापण्यासाठी कोणते मशीन वापरले गेले आहे? बनावट नोटा छापण्याची नेमकी पध्दत कोणती व कशी आहे? या टोळीमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे? टोळीकडून आतापर्यंत किती बनावट नोटा छापल्या गेल्या आहेत? बाजारात किती नोटांचे वितरण झालेले आहे? सातारा, सांगलीसह आणखी कोणत्या जिल्ह्यात बनावट नोटा वितरीत झाल्या आहेत का?असे अनेक सवाल उपस्थित झाले असून पोलिस या साखळीचा पर्दाफाश करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

आर्थिक व्यवस्था खिळखिळी करण्याचा डा

गेल्या दीड वर्षापूर्वीच नोटाबंदी झाल्याने देशात खळबळ उडाली होती. जुन्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करुन नव्या स्वरुपात 2000, 1000, 500 रुपयांच्या नोटा छापण्याचा निर्णय झालेला आहे. नोटाबंदीमागे दहशतवादी कारवाई, काळ्या पैशाला दणका या हेतुसह बाजारात बनावट नोटा असल्याने त्या हद्दपार करण्याचा विचार होता. नव्या स्वरुपातील नोटा बाजारात आल्यानंतर गेल्या वर्षभरात बनावट नोटा असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र सातारा, सांगली येथेही बनावट नोटांचा सुळसुळाट समोर आल्याने या पाठीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. बनावट नोटा बाजारात आणून आर्थिक व्यवस्था खिळखिळी करण्याचा हा प्रकार असल्याचीही धक्‍कादायक माहिती आहे.

मूळ परदेशात की आजूबाजूला?

सातारा जिल्ह्यात यापूर्वीही बनावट नोटा सापडल्याचे वास्तव आहे. पोलिसांनी बनावट नोटाप्रकरकरणी कारवाई केल्यानंतर तपासामध्ये मात्र बनावट नोटांची लिंक अनेकदा बांगलादेश, पाकिस्तानसह दुसर्‍या देशात जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे तपासाला स्थानिक पोलिसांना मर्यादा आल्याचे समोर आलेले आहे. आताचे प्रकरण मात्र थोडे वेगळे असल्याची चर्चा आहे. बनावट नोटा सातारा किंवा शेजारील जिल्ह्यात छापल्या गेल्या असल्याची शक्यता आहे. अंतिमत: नोटा कुठेही छापल्या गेल्या असल्या तरी त्यापर्यंत पोलिसांनी पोहचणे आवश्यक आहे. यामुळे बनावट नोटा छापणारे नेमके कोण आहेत? यामागील नेमका उद्देश काय? याचा पर्दाफाश होणे गरजेचे बनले आहे.