Your Own Digital Platform

सातारा : कास रस्त्यावर लूटमार करणाऱ्या दोघांना अटक


सातारा : कास रस्त्यावरील देवकल (ता.सातारा) येथे लुटमार करणार्‍या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली आहे. अक्षय नाथाजी गुजर (वय २२) व सोमनाथ शिवाजी जाधव (वय २२, दोघे रा. फडतरवाडी ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे असून या दोघांनी आणखी लुटमार केली असल्याची शक्यता असून त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, लुटमारीची घटना घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासात गुन्ह्याचा तपास लावण्यात यश आले आहे.याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा लुटमार, जबरी चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवार तीन युवक कासला निघाले होते. यावेळी संशयित दोघांनी त्यांचा रस्ता अडवून लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने १ हजार रुपये, मोबाईल, चांदीची अंगठी असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. कास येथील फिरायला जाणार्‍या पर्यटकांवर हल्ला झाल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसामोर निर्माण झाले होते.

तालुका पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करुन गस्त घातली असता संबंधित दोन संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर लुटमार प्रकरणात संशयितांचे वर्णन जुळत असल्याने त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही संशयितांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली. अवघ्या 24 तासात पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा ओपन केला.

पोनि पी.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जाधव, पोलिस हवालदार सुहास पवार, रमेश शिखरे, विकास मराडे, दिपक पोळ यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.