धरण असूनही येवतीकरांवर पाणीटंचाईचे संकट


येळगांव : येथून जवळच असलेल्या येवती या दोन-अडीच हजार लोकवस्ती असलेल्या गावात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना अक्षरशः वणवण करावी लागत असून गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांपासून केवळ बोअरवेलवर विसंबून राहिल्याने तसेच रखरखत्या उन्हाळ्यामुळे भूजल पातळी खालावल्याने येवतीकरांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. येवती हे गांव तसं येथील धरणामुळे ते पण मध्यम प्रकल्प समजल्या सुमारे पाऊण टी.एम.सी.पाणी साठवण क्षमता असलेल्या जलाशयामुळे प्रसिद्ध आहे.या धरणातील पाण्यामुळे धरणाच्या पूर्वेकडील शेळकेवाडी पासून म्हासोली, सवादे,उंडाळे,ओंड, ओंडोशी आदी परिसरातील अनेक गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न बर्‍यापैकी मिटला आहे मात्र असे असले तरी ज्या येवती गावात हा मध्यम प्रकल्प साकारला,ज्या येवतीकरांच्या त्यागातून हे धरण आज दिमाखात एक पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येत आहे त्या येवती गावातच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते ही शोकांतिका म्हणावी लागेल.

येवती मध्ये असणारे दोन पाणवठे अर्थात गाव विहिरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेल्या. 1972 च्या दुष्काळापूर्वी या गावात पहिली बोअरवेल मारण्यात आली ती बोअरवेल आणायला या विभागात रस्तेही नव्हते त्याकाळी बैलगाड्यांना अनेक बैलजोड्या जुंपून ही यंत्रणा येवतीत आणण्यासाठी येवतीच्या लोकांनी खस्ता खाल्या. त्यानंतर पाणी टंचाई जाणवायला नको म्हणून 1980 च्या दरम्यान दुसरी बोअरवेल मारण्यात आली तिला मुबलक पाणी लागले. त्या बोअरवेल वरून त्या काळात टँकरने येवती परिसरातील वाड्यांसह शेजारच्या पाटण तालुक्यातील मस्करवाडी, शेडगेवाडीसह वरेकरवाडी पर्यंत पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती वयस्कर मंडळी देतात.

या बोअरवेलने येवतीकरांना भरपूर साथ दिली मात्र मध्यंतरीच्या कालखंडात गावाच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात एखादी धरणाखाली विहीर खोदून म्हणा किंवा अन्य मार्गानी एखादी पेयजल योजना राबविण्याची आवश्यकता होती मात्र याबाबत कायम स्वरुपी तोडगा काढण्याऐवजी आहे त्याच बोअरवेलची डागडुजी करण्यात सर्वांनीच धन्यता मानल्याने येवतीवर जलसंकट ओढवल्याचे ग्रामस्थ सांगतात. आधीच जुनी बोअरवेल, जुनीच पाईपलाईन, जुना तोही बैठा व अपूरा जलकुंभ अर्थात पाण्याची टाकी तिलाही ठिकठिकाणी गळती. त्यात महावितरणच्या थ्री फेज विद्युत पुरवठ्याच्या म्हणजेच भारनियमनाच्या चुकीच्या टाईम टेबल अशा सर्वच समस्यांमुळे इच्छा असूनही ग्रामपंचायतीला वेळेत गावाला पाणी पुरवठा करता येत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा कर्मचार्‍यांना सगळीकडून तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत आहे.

ग्रामस्थांना उपलब्ध पाणी साठा व उपलब्ध वीजपुरवठा यानुसार रात्री अपरात्री तर अनेक वेळा रखरखत्या भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत प्रतिक्षा करावी लागत आहे. नळपाणी पुरवठा योजनेचे पाणी कधी का येईना मात्र येथील खासगी बोअरवेल धारकांनी माणुसकीचे दर्शन घडवून आपापल्या परीने समाजाला पाणी पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे थोड्या प्रमाणात ग्रामस्थांना पाणी मिळत आहे.

ग्रामपंचायतीने कायमस्वरुपी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी दर्जेदार पेयजल योजना राबवून येवतीकरांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

No comments

Powered by Blogger.