Your Own Digital Platform

हम अभी फीट है!


सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये शुक्रवारी आकस्मिक ‘अँग्री यंग मॅन’ लक्ष्मणराव पाटील यांची एंट्री झाली. गेली काही महिने दुर्धर आजाराशी लढाई करत असलेल्या लक्ष्मणतात्यांनी अ‍ॅन्टी चेंबरमध्ये येवून ‘हम अभी फीट है’ असे विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांना सांगितले. तात्यांच्या एंट्रीने रामराजेही गहिवरून गेले. राष्ट्रवादीचे पितामह लक्ष्मणराव पाटील गेले अनेक महिने पार्किंनसन्स व पॅरालिसीस या दुर्धर आजाराशी लढा देत आहेत. तब्बत बरी नसतानाही तात्या दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या जोरावर पाय रोवून उभे आहेत. शुक्रवारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक आटोपून विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर बँकेच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये बसले होते. राजकीय पदाधिकार्‍यांशी व मित्र परिवाराशी गप्पागोष्टी सुरू असताना अचानक लक्ष्मणराव पाटील यांची एंट्री झाली. तात्यांना पाहताच रामराजेंनी ‘माझ्या शेजारी बसा’ असे खुणावले. तब्बेत कशी? असे विचारताच ‘हम अभी फीट है’ असा फिल्मी डायलॉग लक्ष्मणराव पाटील यांनी मारला.

त्याला सॅल्युट करत रामराजेंनी दाद दिली. लक्ष्मणराव पाटील यांनी लगोलग रामराजेंचा हात हातात घेतला. दोन्ही बुजुर्ग नेते अनेक दिवसांच्या भेटीनंतर गहिवरून गेले. तब्बेत सांभाळा, असा सल्ला रामराजेंनी दिला. त्याचवेळी हात उंचावत लक्ष्मणराव पाटील यांनी जिद्द जिवंत असल्याचे सुचित केले. मूठ आवळत आपण अजुनही खमक्या असल्याचे त्यांनी दर्शवले. तात्या लवकर बरे झाले तर बरेच काही घडेल, असे रामराजे बोलून गेले. रामराजेंच्या या विधानावर तात्यांनी लगेचच त्यांच्या पाठीवर हात ठेवत रामराजेंना सुचित इशारा केला. तात्या तुमच्या मनातले होईल, असे रामराजे बोलून गेले. राम-लक्ष्मणाच्या या भेटीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अ‍ॅन्टी चेंबर काही काळ जुन्या आठवणीत रमून गेले.