Your Own Digital Platform

भैय्यू महाराजांच्या अस्थींचे संगममाहुलीत विसर्जन


सातारा : राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज हे अध्यात्मिक गुरू होतेच याशिवाय सकलजणांचे ते चांगले मित्र व हितचिंतकही होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांचे विचार, आदर्श सामाजिक कार्य अधिक गतीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. चित्रलेखा माने -कदम यांनी केले. प. पु. भैय्यूजी महाराज यांच्या अस्थिकलशाचे सातारा येथील संगम माहुली येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. चंद्रशेखर घोरपडे, रणजित देशमुख, बाबुराव शिंदे, संतोष जाधव, गणेशचंद्र पिसाळ, रविराज देसाई आदी उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख म्हणाले भैय्यू महाराज हे विचारांचे व्यासपीठ होते. त्यांच्या विचाराने देशभरात लाखो तरूण कार्यरत आहेत. बाबुराव शिंदे म्हणाले, त्यांच्या विचारांचे व आदर्शांचे कायम जतन व्हावे.

यावेळी गणेशचंद्र पिसाळ, संतोष जाधव, सुशांत निंबाळकर, सुजीत आंबेकर, रणधीर जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, भैय्यू महाराज यांचे शिष्य आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

असा सामाजिक संत होणे नाही

भैय्यूजी महाराज यांचे सामाजिक कार्य अफाट आहे. अनेक पिढ्यांना आदर्शवत काम दाखविणार्‍या या व्यक्तीमत्वाचे असे आकस्मिक जाणे हे मनाला न पटणारे आहे. देशासाठी ही एक प्रचंड मोठी सामाजिक हानी ठरली आहे. असा सामाजिक संत यापुढे होणे नाही. - श्रीनिवास पाटील, राज्यपाल सिक्कीम