Your Own Digital Platform

अंकुश चव्हाण यांनी कुटुंबाला मिळवून दिली आई


मायणी :  मायणी-बोपोशीतील ( पुर्नवसन ) बकुळाबाई राणोजी मोकाशी ह्या आपल्या मुलगा यशवंतकडे मानखुर्दला राहत होत्या. काल सकाळी साडेसहा वाजता घराजवळूनच अचानक बेपत्ता होऊन वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात पोहचल्या. ही माहिती वाशी पोलीसामार्फत मायणीतील अंकुश चव्हाण यांना समजल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने गावाकडच्या कुटुंबाला माहिती कळवताच त्या सुखरूप घरी पोहचल्या.

याबाबत अधिक माहिती, मायणीजवळ बोपोशी हे स्थलांतरीत गाव आहे. बकुळाबाईचा मोठा मुलगा श्रीरंग मायणीत तर नामदेव, भरत, यशवंत , बाळू ही चार मुले , मुलगी शारदा व बाई ही मुबईत राहतात. काही दिवसापूर्वी गावी आलेल्या शारदासोबत मुंबईला गेल्या. तिच्याकडे मुक्काम करून त्या मुलगा यशवंतकडे मुक्कामास गेल्या. सुरवातीलाच शहराकडे जाण्यास ना असणाऱ्या बकुळाबाईना मुंबईचे वातावरणात रमल्या नाहीत. आज सकाळी साडेसहा वाजता बकुळाबाई घराजवळ फेरफटका मारत असतानाच अचानक हरवल्या. 

त्या मानखुर्दची ट्रेन पकडून सानपाड्यात पोहचल्या. तिथे काही महिलांना बकुळाबाई ह्या चुकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे महिला पोलीसाना कळविले. त्यानंतर बकुळाबाईना वाशी पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले. तिथे मुळच्या म्हसवडच्या असणाऱ्या सारिका बोराटे या महिला पोलीसाने बकुळाबाईची चौकशी करत खटाव-माण मध्ये संपर्क केला. वयोवृद्ध व घाबरलेल्या बकुळाबाईना सुरवातीला आपले नाव नीट सांगता येत नव्हते. मात्र महिला पोलीस बोराटे यांनी प्रेमाने आपुलकीने गावाचे नाव विचारल्यानंतर आपले गाव खटाव- मायणीजवळ असल्याचे सांगितले. 

ही माहिती मोबाईलव्दारे राजापूरच्या महादेव घनवट यांनी खटावच्या प्रकाश मदने यांना सांगितली. त्यांनी ती अंकुश चव्हाण यांना सांगितली. त्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे सुभाष माळी, किरण मिसाळ यांच्या मदतीने मायणीजवळच्या बोपोशीमधील बकुळाबाईंच्या घराचा शोध घेतला. ही माहिती मिळताच मोठा मुलगा यशवंत यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. त्यांनी आपल्या मुंबईच्या यशवंतला लगेच संपर्क करून आई वाशीला असल्याचे सांगितले. सकाळपासून मुंबईत आईच्या शोधात असणाऱ्या श्रीरंग, नामदेव, भरत, यशवंत , बाळू व मुलगी शारदा यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. हे सर्व मायणीतील अंकुश चव्हाण यांच्यामुळे शक्य झाल्याने त्यांनी
त्याचे आभार व्यक्त केले. श्री. चव्हाण हे एका दैनिकात वार्ताहर म्हणून काम करतात.


कोट : गावावरून मोबाईलमुळे आई सापडल्याचे कळल्यावर जीव भांड्यात पडला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.हे सर्व अंकुश चव्हाण
यांच्यामुळे हे शक्य झाले
- यशवंत मोकाशी - मानखुर्द -मुंबई