Your Own Digital Platform

एस.टी.ची चाके थांबली..!


सातारा : एस.टी कर्मचार्‍यांसंदर्भात वेतनवाढ उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल म्हणजे कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याने पगारवाढीसह इतर मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने शुक्रवारी सातारा जिल्ह्यात एस.टीची सेवा विस्कळीत झाली. दरम्यान, या संपामुळे प्रवाशांचे रात्रीपासून हाल सुरू आहेत. सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर एस.टी. कर्मचार्‍यांनी दुसर्‍यांदा संप केल्याने प्रवाशांमधून संतापाची लाट उसळली आहे.परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी जाहीर केलेल्या एकतर्फी वेतनवाढीस कामगारांचा विरोध आहे.सर्व कर्मचार्‍यांना 32 टक्के ते 48 टक्के वाढीचा दावा मात्र प्रत्यक्षात ती केवळ 17 टक्के ते 25 टक्के पर्यंतच वाढ असल्याची माहिती काही अधिकृत सुत्रांकडून समजली.

यापुढे रा. प. कामगारांना हप्त्या हप्त्याची थकबाकी बंद असे अध्यक्षांनी जाहीर केले होते. मग आता 48 हप्त्यात थकबाकी कशासाठी ? संपूर्ण राज्यात कुठेही घर भाडे भत्ता कमी केला नाही. मग रा. प.महामंडळातच कमी का? वार्षिक वेतनवाढीचा दर हा वेतन करारान्वये 2008 पासून 3 टक्के असताना व सातव्या वेतन आयोगामध्येही 3 टक्के असताना तसेच राज्य शासनामध्येही 3 टक्के असताना रा. प. महामंडळालाच 2 टक्के कशासाठी? असे अनेक सवाल एस.टी. कर्मचार्‍यांमधून उपस्थित केले जात आहेत. ही वेतनवाढ फसवी असल्याचा दावा कामगारांकडून केला जात असल्याने त्याच पार्श्‍वभूमीवर हा संप पुकारण्यात आला आहे.

जर वेतनवाढ 4849 कोटी रूपयांची आहे तर त्याच रक्कमेमध्ये नेहमीची पध्दत वापरून यापेक्षा अधिक वेतनवाढ संघटनेच्या सुत्रानुसार संघटना करून देण्यास तयार आहे याची तयारी ठेवावी. जर ही ऐतिहासिक वेतन वाढ आहे तर ती घेण्यासाठी सक्ती कशासाठी? व ती न स्वीकारल्यास राजीनामा देण्याची धमकी कशासाठी? म्हणून या एकतर्फी वेतनवाढीस कामगारांचा विरोध असल्याने सर्वच एसटी कर्मचार्‍यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे.

या संपात महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक, व अन्य कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड , पाटण, वाई , महाबळेश्‍वर, मेढा, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज या 11 आगारात रात्रीपासून एस.टी जागेवरच उभ्या आहेत. या संपामुळे प्रवाशांचे रात्रीपासूनच हाल सुरू झाले आहेत.सातारा बसस्थानकात तर कर्नाटकसह अन्य आगाराच्या बसेसही आल्या नाहीत. अनेक प्रवाशांना बसस्थानकात बाकड्यावर बसून एस.टीची वाट पहावी लागली तर काही प्रवाशांनी हायवेला जाणे पसंत केले.

अचानक संप पुकारल्याने काही एसटी बसस्थानकातच थांबल्याने प्रवाशी व चालक, वाहकात शाब्दीक बाचाबाचीचे प्रसंग घडले. सकाळी 11 वाजतेपर्यंत सातारा बसस्थानकातून कोल्हापूरकडे जाणारी शिवशाही व रोह्याकडे जाणार्‍या दोन बसेस पोलिस संरक्षणात मार्गस्थ करण्यात आल्या.

ऐन उन्हाळी हंगाम व सुट्ट्यांच्या काळात हा एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला गेल्याने या संपाची पूर्वकल्पना नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.उन्हाळी सुट्टी संपत असून सुट्टीसाठी गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना आता परतीचे वेध लागले आहेत.त्यातच येत्या दोन ते तीन दिवसात नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत असल्याने ऐन गर्दीच्या हंगामात संप पुकारल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, संपाचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या टुरिस्ट व वडाप व्यावसायिकांना झाला. त्यामुळे अनेकांनी अव्वाच्या सव्वा पैसे आकारण्यास सुरूवात केली.