Your Own Digital Platform

एस.टी.च्या अडीच हजार फेर्‍या रद्द


सातारा : एस.टी. कर्मचार्‍यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्याने सातारा जिल्ह्यातील सर्वच स्थानकांत एसटीची चाके जागीच खिळून राहिली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले असून अनेकांचा कामाचा खोळंबा झाला. संपामुळे अनेक ठिकाणी प्रवासी व एस.टी. अधिकार्‍यांमध्ये ‘तू तू-मैं मैं’ झाले असून सातारा आगारात तर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. गैरसोयीमुळे संतापलेल्या प्रवाशांनी अधिकार्‍यांनाच टार्गेट केले. दरम्यान, सातारा विभागातील सुमारे 2 हजार 500 एस.टी.च्या फेर्‍या रद्द झाल्या.एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सातारा बसस्थानकातून लांबपल्यासह ग्रामीण भागात एकही फेरी गेली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. काही लांबच्या प्रवाशांनी बसस्थानकात ठिय्या मांडला. शेवटी त्यांनी दुपारपर्यंत संप मिटेल असे चित्र होते मात्र संप काही मिटेनासा झाल्याने प्रवाशी थेट महामार्गावर जावून तेथून खासगी वाहनाने प्रवास करत होते. सकाळी 11च्या सुमारास पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारी शिवशाही बस सातारा बसस्थानकात आल्यानंतर ही बस पोलिस बंदोबस्तात कोल्हापुरकडे रवाना झाली. तसेच रोहाकडे जाणार्‍या दोन एस.टी बसेसही बंदोबस्तात रवाना झाल्या.

सातारा बसस्थानकाच्या कार्यशाळेत एसटी बसेस लावण्यात आल्या होत्या. अनेक चालक , वाहक व अन्य कर्मचारी बसस्थानक परिसरात गटागटाने संपाबाबत चर्चा करताना दिसत होते. संपाच्या पार्श्‍वभुमीवर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी चोख पोलिस बंदोबस्त सातारा बसस्थानकात ठेवला होता. त्यामुळे बसस्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सातारा बसस्थानकातील तुरळक प्रवाशांव्यतिरिक्त सर्वत्र शुकशूकाट जाणवत होता. कॅन्टींनही बंद असल्याने प्रवाशांसह अन्य नागरिकांची गैरसोय झाली.

अचानक संपाचे हत्यार कर्मचार्‍यांनी उपसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. उन्हाळी सुट्टीसाठी चाकरमनी गावाकडे सुट्टीची मजा लुटण्यासाठी आले होते. त्यातच 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत आहे. त्यामुळे चाकरमन्यांना परतीचे वेध लागले आहेत. अशा वातावरणातच अचानक एस.टी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. एसटीच्या संपामुळे प्रवाशांचा लोंढा खाजगी वाहनांकडे वाढला होता. त्यामुळे खाजगी वाहनधारकांचे चांगलेच फावले आहे.

आरक्षण केलेल्या प्रवाशांना भुर्दंड
जिल्ह्यातील अनेक प्रवाशांनी विविध ठिकाणी जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. मात्र, कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने अनेक प्रवाशांनी ऑनलाईन रिझर्वेशन रद्द केले. तिकीट दराचे आकारण्यात आलेले सर्वच्या सर्व पैसे प्रवाशांना मिळणे गरजेचे होते. मात्र, अनेक प्रवाशांना तिकीट दराचे पूर्ण पैसे न मिळता सुमारे 100 रुपयांचा तरी भुर्दंड बसलाच. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्‍त केला. याबाबत एस.टी.च्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी तुम्ही ऑनलाईन तक्रार करा, अशी सूचना दिल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.